Home > Politics > संजय शिरसाठ शिवसेनेत परतणार? उध्दव ठाकरे यांचा कुटूंबप्रमुख म्हणून केला उल्लेख

संजय शिरसाठ शिवसेनेत परतणार? उध्दव ठाकरे यांचा कुटूंबप्रमुख म्हणून केला उल्लेख

एकनाथ शिंदे यांनी मंत्रीमंडळात संधी न दिल्याने संजय शिरसाठ नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातच संजय शिरसाठ यांनी उध्दव ठाकरे यांचा उल्लेख कुटूंबप्रमुख असा केला आहे.

संजय शिरसाठ शिवसेनेत परतणार? उध्दव ठाकरे यांचा कुटूंबप्रमुख म्हणून केला उल्लेख
X

एकनाथ शिंदे यांच्यासोबत औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाठ यांनी स्वपक्षाविरोधात बंड केले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र शिंदे—डणवीस सरकारच्या मंत्रीमंडळात संजय शिरसाठ यांना डावलण्यात आल्याने संजय शिरसाठ नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातच संजय शिरसाठ यांनी उध्दव ठाकरे यांचा महाराष्ट्राचे कुटूंबप्रमुख असा उल्लेख करत ट्वीट केले आहे. तर या ट्वीटसोबत उध्दव ठाकरे यांचा विधानसभेतील व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे. त्यामुळे संजय शिरसाठ पुन्हा शिवसेनेत परतणार का? अशी चर्चा रंगली आहे.

संजय शिरसाठ यांनी केलेल्या ट्वीटवर प्रतिक्रीया आल्यानंतर संजय शिरसाठ यांनी अखेर ट्वीट डिलीट केले आहे. मात्र यानंतर प्रतिक्रीया देतांना संजय शिरसाठ म्हणाले की, मी मंत्रीपदासाठी भुकेलेलो नाही. तसंच मी हे ट्वीट मंत्रीपदासाठी केलेलं नाही. मी तत्वाने वागणारा माणूस आहे. त्यामुळं मी स्पष्ट करतो की, आम्ही आजही शिवसेनेतच आहोत. जो आमचा नेता असतो तो आमचा कुटूंबप्रमुख असतो. त्यानुसार बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उध्दव ठाकरे यांना कुटूंबप्रमुख मानलं.

आमच्यात वाद झाले असले तरी आम्ही त्यांच्याविरोधात बोलू शकत नाही. ते आमचे कुटूंबप्रमुख होतेच. मात्र राष्ट्रवादी काँग्रेससोबत शिवसेनेने जाणं हे आम्हाला पटत नव्हतं. त्यामुळे आम्ही वेगळे झालो. मात्र आमचं नातं अजून जीवंत आहे. आम्ही नातं तोडलं नाही. आम्ही आमच्या भुमिकेवर आणि ते त्यांच्या भुमिकेवर ठाम आहोत, असंही शिरसाठ म्हणाले.

यावेळी शिरसाठ यांनी बोलताना सांगितले की, उध्दव ठाकरे हे कुटूंबप्रमुख असल्याचे ट्वीट मार्चमध्ये केले होते. मात्र ते तांत्रिक चुकीमुळे पुन्हा एकदा ट्वीट झाले. मात्र सध्या आमचे कुटूंबप्रमुख हे एकनाथ शिंदे असल्याचे म्हटले आहे. त्याबरोबरच बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत असल्याचे म्हटले आहे.

याबरोबरच मातोश्रीवर जाणार का? या प्रश्नावर सध्यातरी नाही. भविष्यातील सांगता येणार नसल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. त्यामुळे संजय शिरसाठ यांनी या वाक्यातून एकनाथ शिंदे यांनी पुढील विस्तारात मंत्रीपद दिले नाही तर मातोश्रीवर जाऊ शकतो, असा सूचक इशारा दिला आहे का? अशी चर्चा रंगली आहे.

Updated : 13 Aug 2022 5:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top