Home > Politics > दिल्लीतील नेते महाराष्ट्रातील नेत्यांचे पाय का खेचतात?

दिल्लीतील नेते महाराष्ट्रातील नेत्यांचे पाय का खेचतात?

देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्यानंतर त्यांची उपरोधितपणे चेष्टा केली जात आहे. मात्र, या निमित्ताने हुशार, कुशाग्र, बुद्धीमत्ता असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचा पत्ता का कट झाला? शरद पवार, नितीन गडकरी या सारख्या महाराष्ट्रातील नेत्यांना सातत्याने दिल्लीत का डावलले जाते? असा सवालही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. याच प्रश्नांचं डॉ विनय काटे यांनी केलेलं विश्लेषण…

दिल्लीतील नेते महाराष्ट्रातील नेत्यांचे पाय का खेचतात?
X

देवेंद्र फडणवीस यांची उपरोधिक पद्धतीने जी चेष्टा सध्या सोशल मीडियामध्ये आणि राजकीय वर्तुळात सुरू आहे त्याच्याशी मी सहमत नाही. उपमुख्यमंत्रीपद देवून त्यांचे पंख कापायचा प्रयत्न दिल्लीतून प्रयत्न झाला असेल का? निश्चितच हो. सलग दोन-तीन वेळा सरकार बनवणाऱ्या प्रत्येक भाजपच्या मुख्यमंत्र्यांस मोदी-शाह जोडीने आपला प्रतिस्पर्धी म्हणून पाहत त्यांचे पंख कापले आहेत, मग ते रमण सिंग असोत की शिवराज सिंग.

शरद पवारांची राज ठाकरेंनी घेतलेली मुलाखत मी काल पाहत होतो, त्यात पवारांनी व्यवस्थित सांगितले होते की महाराष्ट्रातील नेत्यांना दिल्लीत मोठे होवू न देणारी एक मोठी लॉबी सतत कार्यरत असते. माझ्या मते ही लॉबी फक्त काँग्रेस नाही तर भाजपमध्ये सुद्धा आहे, म्हणूनच नितीन गडकरींसारखा एक जाणकार नेता पंतप्रधान पदापर्यंत पोहचू दिला जात नाही. मोदी, शाह, योगी अशी यादी वाढताना तिथे गडकरी टाळले जातात.

नितीन गडकरींचे वय लक्षात घेता ते नजीकच्या भविष्यकाळात कदाचित पंतप्रधान बनू शकणार नाहीत. पण, फडणविसांचे वय पाहता त्यांच्याकडे मोठी शक्यता आहे की ते भविष्यात पंतप्रधानसुद्धा बनू शकतात. पाच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात फडणवीसांनी कधीही मोदी-योगी यांच्यासारखे कट्टर हिंदुत्व दाखवले नाही की कुणाच्या घरावर बुलडोझर चालवले नाहीत. सध्या मोदी-शाह-योगी हे संघाच्या हाताबाहेर गेलेले नेते आहेत. पण भविष्यात जेव्हा भाजपला कट्टर हिंदुत्व बाजूला ठेवून स्वतःला मवाळ बनवावे लागेल आणि जेव्हा ड्रायव्हिंग सीटवर संघ असेल तेव्हा फडणवीस हे त्यांची आवडती चॉईस असतील.

प्रत्येकाच्या स्वभावात दोष असतात, तसे फडणवीस यांच्या स्वभावातसुद्धा आहेत. पण वयपरत्वे ते त्यांचे दोष सुधारू शकतील एवढा वेळ त्यांच्याकडे नक्कीच आहे. काही महिने आधी त्यांनी भाजपला गोवा परत जिंकून दिला आहे, तेव्हा त्यांचा आलेख राज्यात आणि राज्याबाहेरसुद्धा चढता आहे. फडणवीस लंबी रेस खेळण्यासाठी इथे आहेत. कदाचित महाराष्ट्रातून पहिला पंतप्रधान म्हणून फडणवीस यांचे नाव अजुन दहाएक वर्षांनी आपण पाहू. राजकारण शक्यतांचा खेळ आहे, आणि इथे चांगल्या नेत्यांच्या बाजूने जास्त शक्यता उभा राहतात.

पक्षीय आणि वैचारिक विरोध बाजूला ठेवून बघा. देवेंद्र फडणवीस या नेत्यात शिकण्यासारखे खूप आहे!

- डॉ. विनय काटे

Updated : 2 July 2022 11:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top