Home > Politics > काँग्रेसने सातव परिवाराला का डावलले?

काँग्रेसने सातव परिवाराला का डावलले?

काँग्रेसने सातव परिवाराला का डावलले?
X

काँग्रेस पक्ष वाढीसाठी महाराष्ट्राबरोबरच शेजारील राज्य गुजरातमधे जोमाने प्रयत्न करणाऱ्या युवानेते माजी खासदार स्व. राजीव सातव यांच्या दुदैवी मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्याचे पुर्नवसन होईल अशी अपेक्षा असताना कॉंग्रेसनं धक्का देत माजी खा. रजनी पाटील यांच्या नावाची घोषणा केल्यानं सातव कुटुंबाच्या उपेक्षेची भावना व्यक्त होत आहे. मात्र कॉंग्रेसनं समतोल साधत जुन्या-नव्याचं गणित जुळवल्याची राजकीय तज्ञाचं म्हणनं आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमध्ये विजय मिळविणाऱ्या माजी खासदार सातव यांनी पक्षासाठी मोठं योगदान दिला. काँग्रेसच्या नेत्या सोनीया गांधी, राहूल गांधी यांच्या निकटचे व्यक्तीमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. पक्षाने टाकलेली जबाबदारी विश्वासाने पूर्ण करण्यासाठी त्यांनी वेळोवेळी प्रयत्न केले तसेच सर्वच जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या होत्या.

त्यानंतर त्यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठविण्यात आले.लोकसभेत कृषी विधेयकांवर आक्रमक होताना त्यांनी निलंबन स्विकारले. मात्र कोविड संसर्गामुळे २३ दिवस मृत्युशी संघर्ष करत त्यांचा चार महिन्यापुर्वीच निधन झालं. मध्यंतरीच्या काळात राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांनी त्यांच्या मुलासह पक्षश्रेष्ठींची भेट घेतली होती. पोटनिवडणुकीत त्यांना संधी मिळेल अशी अपेक्षा असताना अचानकपणे कॉंग्रेसने रजनी पाटील यांचे नाव घोषीत करुन धक्का दिला.

विशेष म्हणजे रजनी पाटील यांचं नाव राज्यपालांकडे रखडलेल्या १२ जणांच्या यादीत होतं. त्यांना विधानपरीषदेवर राज्यपाल नियुक्त कोट्यातून पाठवण्याचा काँग्रेसचा विचार होता. मात्रा, त्यांना आता काँग्रेसने राज्यसभेची उमेदवारी दिली. यामुळे राज्यपालांना देण्यात आलेली बहुर्चित १२ जणांची यादीही आता बदलली जाण्याची शक्यता आहे. कॉंग्रेसच्या या भुमिकेविषयी बोलताना दिल्लीस्थित ज्येष्ठ पत्रकार अजय बुवा म्हणाले, ``रजनी पाटील यांचे अॅक्टीव राजकारणात फारसे योगदान नाही. राजीव सातवांच्या दृष्टीनं ओबीसी फॅक्टर महत्वाचा ठरला होता. ते युवा कॉंग्रेसचे नेते होते. शेजारचं राज्य गुजरातमधेही त्यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली होती.राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव या सध्या हिंगोली मतदारसंघ सांभाळत आहे. नवं- जुनं आता वाद कॉंग्रेसमधे आहेच. त्यातून रजनी पाटील यांची लॉयल्टी महत्वाची ठरली. विशेष म्हणजे कॉंग्रेसने बाहेरचा माणुस न देता महाराष्ट्राचाच माणुस दिला. मुकुल वासनीक स्पर्धक होते. राहुल गांधी विरोधक टिएममधे असल्यानं त्यांचा पत्ता कट झाला. प्रज्ञा सातवा यांना विधानपरीषदेत संधी मिळण्याची शक्यता आहे.``

गेल्या काही दिवसात राजीव सातव समर्थकांनी त्यांच्या पश्चात राज्यसभेवरील रिक्तजागेसाठी त्यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना उमेदवारी द्यावी अशी जोरदार मागणी केली होती. त्यानंतर पक्षश्रेष्ठींनी त्यांना दिल्ली येथे बोलावून काँग्रेसपक्ष नेहमीच सातव कुटुंबियाच्या पाठीशी राहणार असल्याचे आश्वासनही दिले होते. त्यामुळे डॉ. सातव यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार असं निश्चित असताना रजनी पाटलांच्या रुपानं मोठा धक्का बसला.
काल काँग्रेस पक्षाने अधिकृतपणे राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून रजनी पाटील यांचे नाव जाहिर केले. त्यामुळे हिंगोली जिल्हयातील काँग्रेस पदाधिकारी आणि समर्थकांना धक्का बसला आहे. प्रकारामुळे कार्यकर्त्यांमधून तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र पक्षाकडून विधान परिषदेसाठी विचार होईल अशी अपेक्षाही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या संदर्भात डॉ. प्रज्ञा सातव यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क झाला नाही.

Updated : 2021-09-22T09:45:33+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top