Home > Politics > हा 'बाण' कुणाचा?

हा 'बाण' कुणाचा?

महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांनी बंडाळी केल्यानंतर रोज नव्या नव्या राजकीय घटना होत आहेत. विधानसभा उपाध्यक्षांकडे स्वतंत्र गटाचा दावा केल्यानंतर आता शिवसेनेच्या स्थापनेपासून असलेले 'धनुष्यबाण' चिन्हावर दावा केला आहे. चिन्ह महत्वाचे कि पक्ष आणि पक्ष नेतृत्व ?इतिहासाच्या आधारे सांगत आहेत ज्येष्ठ संपादक संजय आवटे..

हा बाण कुणाचा?
X

एकनाथ शिंदे यांच्या गटाला 'धनुष्यबाण' हे चिन्ह मिळू शकते आणि खरी शिवसेना हीच, असेही सिद्ध होऊ शकते. अखेरीस हे सिद्ध करणार कोण? निवडणूक आयोग! त्याविषयी काय बोलावे?

पण, उद्धव ठाकरे यांनी आदर्श घ्यावा तो इंदिरा गांधींचा. १९६९ मध्ये कॉंग्रेसच्या काही मूर्खांनी इंदिरा गांधींनाच पक्षातून बाहेर काढले. पक्षात उभी फूट पडली. बैलजोडी हे चिन्हही इंदिरा गांधींकडून हिरावून घेतले गेले.

दूर कशाला, आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधींनी हाताचा पंजा हे चिन्ह निवडले. १९७७ ची लोकसभा निवडणूक इंदिरा गांधी हरल्या. अगदी स्वतःही पराभूत झाल्या. 'बाई संपल्या', असे लोकांनी जाहीर करून टाकले.

गंमत बघा. या काळात महाराष्ट्रात जे घडले, ते आजच्या काळाशी सुसंगत मानावे लागेल. १९७७ मध्ये लोकसभा निवडणूक झाली. त्यात इंदिरा गांधी पराभूत झाल्या. जनता पक्षाने निवडणूक जिंकली. मोरारजीभाई देसाई पंतप्रधान झाले.

त्यानंतर १९७८ मध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक झाली. ती निवडणूक इंदिरा गांधींची कॉंग्रेस, यशवंतराव चव्हाण आणि रेड्डी यांची (मूळ) कॉंग्रेस आणि जनता पक्ष या तिघांनी स्वतंत्रपणे लढवली. जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यांना ९९ जागा मिळाल्या. मात्र, त्यांना विरोधात बसवले गेले. आणि, दोन्ही कॉंग्रेस एकत्र आल्या. इंदिरा कॉंग्रेसकडे जागा कमी होत्या. त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाले. फुटीर कॉंग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळाले. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले. नासिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री झाले.

इंदिरा गांधींची कॉंग्रेस तेव्हा राज्यात आणि देशात दुबळी होती. दुसरी कॉंग्रेस शक्तिमान होती. आणि, जनता पक्ष सर्वशक्तिमान होता. राज्यात दोन्ही कॉंग्रेस सत्तेत आल्या. पण, शरद पवारांनी ४१ आमदार सोबत घेतले आणि जनता पक्षासोबत जाऊन सरकार बनवले. तेव्हाही, उपमुख्यमंत्र्यांबद्दलची नाराजी हा एक मुद्दा होता. अगदी कमी आमदार सोबत असूनही शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद मिळवले.

मात्र, केंद्रातले सरकार अल्पावधीत पडले. मुदतपूर्व निवडणूक झाली. १९८० ची ही निवडणूक इंदिरा गांधींनी लढवली. हाताचा पंजा हे त्यांचे चिन्ह होते. आणि, इंदिरा गांधींनी त्या निवडणुकीत प्रचंड यश मिळवले. केंद्रात तर त्यांची सत्ता आलीच. पण, राज्य सरकारही बरखास्त झाले. मग, महाराष्ट्रातही इंदिरा कॉंग्रेसची सत्ता आली.

बंडखोर कॉंग्रेस हीच मूळ कॉंग्रेस आहे, असे निवडणूक आयोगाने मान्य करूनही; इंदिरा गांधींचे निवडणूक चिन्ह हिरावून घेऊनही इंदिरा गांधी अजिंक्य ठरल्या. उद्धव ठाकरेंनी इतिहासाचा हा दाखला लक्षात घ्यावा.

- संजय आवटे

Updated : 24 Jun 2022 8:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top