Home > Politics > WEF26 | पोलंड आणि कोल्हापूरचं खास कनेक्शन – युवराज संभाजीराजे छत्रपती

WEF26 | पोलंड आणि कोल्हापूरचं खास कनेक्शन – युवराज संभाजीराजे छत्रपती

WEF26 | पोलंड आणि कोल्हापूरचं खास कनेक्शन – युवराज संभाजीराजे छत्रपती
X

दावोस : पोलंड आणि कोल्हापूरचं खास कनेक्शन असल्यानं त्याचा फायदा हा भारत आणि पोलंडमधील संबंध वृद्धिंगत करण्यासाठी होईल, असा विश्वास माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी दावोस इथं व्यक्त केला.

वर्ल्ड इकोनॉमिक फोरम (WEF) या स्वित्झर्लंडस्थित आंतरराष्ट्रीय संस्थेनं आयोजित केलेल्या दावोस येथील वार्षिक परिषदेत सहभागी होण्यासाठी पोलंड या देशाने युवराज संभाजीराजे छत्रपती यांना विशेष निमंत्रित केलंय. वर्ल्ड इकोनॉमिक फोरम अंतर्गत सेंटर फॉर इंटरनेशनल रिलेशन्स, पोलंड या संथेने आयोजित केलेल्या “लीडर्स फोरम” या सत्राच्या उद्घाटन समारंभास संभाजीराजे छत्रपती प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

या उद्घाटन समारंभास संभाजीराजे यांच्यासह पोलंडचे उपपंतप्रधान रॅडोस्लाव सिकॉर्स्की, पोलंडचे परराष्ट्र मंत्री झ्बिग्निएव राऊ, युरोपियन युनियनचे संरक्षण व अंतराळ विषयक आयुक्त अँड्रियस क्युबिलियस, युरोपियन स्पेस एजन्सीचे महासंचालक जोसेफ आशबाखर व लिक्टेनस्टाइनचे राजपुत्र हिज हायनेस प्रिन्स मायकेल यांच्यासह युरोप, आशिया, आफ्रिका आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील वरिष्ठ मंत्री, खासदार, जागतिक कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नामवंत अभ्यासक सहभागी झाले होते.

यावेळी माध्यमांशी बोलतांना युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूर आणि पोलंडच्या खास कनेक्शनविषयी भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले,” १९४३ मध्ये दुसऱ्या महायुद्धात हिटलरनं पोलंड वर हल्ला केला होता. त्यावेळी पोलंडच्या पाच हजार निर्वासितांना कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने १९४८ पर्यंत राजाश्रय दिलेला होता. त्यामुळेच कोल्हापूर आणि पोलंडमध्ये कायमस्वरुपी एक भावनिक नातं तयार झालेलं आहे. तसेच त्यावेळी केलेल्या मदतीची जाणीव आजही या देशाने ठेवलेली आहे, असे संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी सांगितले.

भारत आणि पोलंड या दोन्ही देशातील व्यावसायिक संबंध विकसित करुन हे संबंध आणखी मजबूत करता येतील, असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

भारत व पोलंड या दोन देशांमध्ये संबंध दृढ करण्यामध्ये संभाजीराजे यांनी बजावलेल्या भूमिकेचा सन्मान म्हणून पोलंड सरकारने २०२२ साली त्यांना ‘बेणे मेरिटो’ या सन्मानित किताबाने गौरविले आहे. केवळ इतक्यावर न थांबता हे संबंध पुढेही वृद्धिंगत करण्यासाठी पोलंड देश उत्सुक असून संभाजीराजे यांना दिलेले विशेष निमंत्रण हे त्याचेच प्रतिबिंब आहे, असल्याची प्रतिक्रिया छत्रपती युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी दिलीय.

Updated : 20 Jan 2026 5:50 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top