Home > Politics > 'आम्ही राणेंचे नाही राज ठाकरे यांचे कार्यकर्ते आहोत' - अविनाश जाधव

'आम्ही राणेंचे नाही राज ठाकरे यांचे कार्यकर्ते आहोत' - अविनाश जाधव

आम्ही राणेंचे नाही राज ठाकरे यांचे कार्यकर्ते आहोत - अविनाश जाधव
X

ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहीहंडीच्या उत्सवावर निर्बंध घातले असताना ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना दहीहंडी साजरी करणार आहे. याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील भगवती मैदानात उभारण्यात आलेल्या स्टेजवर सोमवारी स्थानिक पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. त्यामुळे उपोषणाला बसणाऱ्या मनसेच्या ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान आमच्यावर कोणताही आणि कितीही गुन्हे दाखल करा आम्ही दहीहंडीचा सण साजरा करणारच यावर मनसे ठाम असल्याचे यावेळी अविनाश जाधव यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने उत्सव अणि सोहळ्यासाठी निर्बंध लादले आहे. मात्र दुसरीकडे हिंदूंचा सण म्हणून दहीहंडी सण साजरा करणार असल्याची भूमिका मनसेच्या वतीने घेण्यात आलेली आहे. त्यासाठी मनसेने तयारी केली होती, परवानगी नसताना देखील मैदानावर स्टेज उभारण्यात आला होता, तो काढण्यासाठी मोठ्या प्रमानात ठाणे पोलीस त्याठिकाणी आले होते. त्यामुळे मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष जाधव यांच्यासह कार्यकर्ते स्टेजवर साखळी उपोषण करण्यास बसले होते. मात्र या ठिकाणी बसलेल्या सर्व जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले, त्यानंतर देखील काही मनसैनिक मैदानातून हटले नाही , त्यानंतर त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यामुळे एकप्रकारे मनसे विरुद्ध पोलीस असा संघर्ष पाहायला मिळाला.

ठाकरे सरकारने गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध दर्शविला आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी रविवारी भेट दिली होती,त्यावर त्यांनी देखील दहीहंडी साजरी करणार असा निर्धार केला होता. मात्र नौपाडा पोलिसांनी सर्व सामान जप्त केले असून कार्यकर्त्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून अखेर सोडून दिले. दरम्यान मनसे दहीहंडीचा करणारच असा पवित्रा अविनाश जाधव यांनी घेतला आहे.

आम्ही राणेंचे नाही राज ठाकरे यांचे कार्यकर्ते

दरम्यान हिंमत असेल तर पोलिसांना बाजूला करून समोर यावे असे थेट आव्हान यावेळी अविनाश जाधव यांनी राज्य सरकारला दिले. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी अविनाश जाधव, मनसे शहरप्रमुख रवींद्र मोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असताना आम्ही राणेंचे नाही राज ठाकरे यांचे कार्यकर्ते आहोत, अश्या शब्दात जाधव यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला.

Updated : 30 Aug 2021 2:05 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top