Home > Politics > Uddhav Thackeray : शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही

Uddhav Thackeray : शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही

Uddhav Thackeray : शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही
X

शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही, असे स्पष्ट करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे सरकारवर पहिल्या प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि आपली भूमिका मांडली. एकनाथ शिंदे यांना शिवसैनिक मुख्यमंत्री मानण्यास नकार देत उद्धव ठाकरे यांनी कायदेशीर लढाई सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम राहणार आहे.

उद्धव ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चेची आणि तडजोडीचे सर्व दरवाजे उद्धव ठाकरे यांनी बंद केले आहेत, हे स्पष्ट झाले आहे. आपल्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. अडीच वर्षांपूर्वी हेच मी सांगत होतो की अडीच वर्ष शिवसेनेचा आणि अडीच वर्ष भाजपचा मुख्यमंत्री असेल, अमित शाह यांच्याशी ठरल्याप्रमाणे झाले असते तर हे सन्मानाने झाले असते, असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. पण त्यावेळी नकार देऊन भाजपने आता हे का केले हा प्रश्न पडला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

अमित शाह यांच्याशी ठरल्याप्रमाणे झाले असते तर महाविकास आघाडीचा जन्मच झाला नसता, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. माझ्या पाठीत सुरा खुपसला पण मुंबईकरांच्या काळजात सुरा खुपसू नका, असे सांगत त्यांनी आरेमध्ये मेट्रो कारशेड करण्यास विरोध दर्शवला आहे.

दिलेला शब्द पाळला असता अडीच वर्ष भाजपचा मुख्यमंत्री झाला असता, आता पाच वर्ष भाजपचा मुख्यमंत्री नसेल, यामध्ये काय साधलं, असा टोलाही त्यांनी लगावला. त्याचवेळी मतांचा आदर झाला पाहिजे अशी भूमिका मांडली. महाविकास आघाडीचा प्रयोग आम्ही केला, पण जनतेला ते आवडले नसेल तर लोकप्रतिनिधींना परत बोलावण्याचा अधिकार असला पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली.

Updated : 1 July 2022 9:11 AM GMT
Next Story
Share it
Top