Home > Politics > नोटांवर महात्मा गांधी यांचा फोटो नसावा, तुषार गांधी यांनी केली मागणी..

नोटांवर महात्मा गांधी यांचा फोटो नसावा, तुषार गांधी यांनी केली मागणी..

नोटांवर महात्मा गांधी यांचा फोटो नसावा, तुषार गांधी यांनी केली मागणी..
X

महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी यांनी राज्यातील सरकारवर तोफ डागली आहे. त्यांनी विविध मुद्द्यांना हात घालत शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरले. आज पैशाचा फायदा फक्त श्रीमंतांनाच होत आहे. तर राज्यात पुतळ्याचे राजकारण सुरू असल्याचे तुषार गांधी यांनी सांगितले.

भारताच्या चलनावर महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचा फोटो आहे. मात्र ज्याप्रकारे या चलनाचा वापर होतो ते गांधींच्या तत्वा विरोधात आहे. आज पैशाचा फायदा श्रीमंतांना होतो. गरिबांना नाही. त्यामुळे नोटेवर गांधी नसावेत असे आपले ठाम मत असल्याचे महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी (Tushar Gandhi) यांनी सांगितले. याचवेळी काँग्रेसची भारत जोडो यात्रा सर्वदूर पसरली असून पक्ष त्याचा फायदा कसा करून घेणार हे पाहाणे महत्त्वाचे असल्याचे तुषार गांधी यांनी यावेळी सांगितले. डोंबिवलीत हेल्पिंग हॅण्ड (Helping Hand) या सामाजिक संस्थेच्या कार्यक्रमात आलेल्या तुषार गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना त्यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशभरात राबविलेला भारत जोडो यात्रा हा आवश्यक उपक्रम होता. त्यातून खूप चांगला संदेश समाजात पोचला असून पक्ष या संधीचा फायदा कसा करून घेतो, हे पाहणे गरजेचे आहे. मात्र यातून मिळालेले यश कशा प्रकारे पक्षाकडून व्यापक बनवता येते यावर यात्रेचे भवितव्य अवलंबून असेल, अशी आशा गांधी यांनी व्यक्त केली.

तुषार गांधी यांना अदानी संदर्भात विचारले असता त्यांनी देशात न्यायतंत्र असेल तर त्यांनी देशातील न्यायाप्रमाणे वागले पाहिजे. सरकारवर टीका करण्यापेक्षा न्याय प्रणालीने आपली स्वतंत्रता दाखविण्यासाठी त्यांना गुन्हे प्रवृत्ती दिसत असेल तर त्यावर कारवाई करणे गरजेचे असल्याचे गांधी यावेळी म्हणाले. पुतळे बनवणारा आणि ते लावणारा हे दोघेही जण आपला अहंकार प्रदर्शित करण्यासाठी पुतळ्याचे राजकारण करत असतात. पुतळ्यावरून सुरु असलेल्या राजकारणावर बोलताना त्यांनी पुतळ्याच्या राजकारणामध्ये आपल्याला थोडे देखील स्वारस्य नसल्याचे गांधी यावेळी म्हणाले. ज्यांची प्रतिमा लावली जाते. त्या पक्षाला त्याचा काहीच फरक पडत नाही. प्रत्येकाने महापुरुष वाटून घेतले आहेत.

Updated : 7 Feb 2023 8:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top