Home > Politics > 'फडणवीस आणि पाटील यांच्या गळ्यात फाटका फुगा अडकला'

'फडणवीस आणि पाटील यांच्या गळ्यात फाटका फुगा अडकला'

नारायण राणे यांच्या रूपाने देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या गळ्यात फाटका फुगा अडकल्याची टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे

फडणवीस आणि पाटील यांच्या गळ्यात फाटका फुगा अडकला
X

मुंबई : नारायण राणे यांच्या रूपाने देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या गळ्यात फाटका फुगा अडकल्याची टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे, त्यामुळे सांगता येत नाही आणि सहनही होत नाही, अशी त्यांची अवस्था झाली असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

सोबतच नको त्या माणसाला सत्तेची दारु पाजल्याने भाजपला असा प्रसंगांना सामोरे जावे लागत असल्याचे सामनामध्ये म्हटलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी अशी भाषा वापरणे म्हणजे 105 हुतात्म्यांच्या भावनांना लाथ मारण्यासारखेच आहे असं म्हणत सामनाच्या अग्रलेखातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार निशाना साधण्यात आला.

राज्यात सत्ता गेल्यापासून भाजपवाल्यांची डोकी कामातून गेली आहेत, त्यातच केंद्रीय मंत्रिपदाची झूल पांघरूनही मूळ स्वभाव काही जाईना. अशी टीका शिवसेनेने केली आहे. यावर आता भाजप नक्की काय करणार? की नेहमीप्रमाणे यावेळी देखील बगला वर करुन नामानिराळे राहणार? असा सवाल सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.

राज्यातील सत्ता हातून निसटल्यापासून त्यांची डोकी कामातून गेली आहे. त्यामुळे त्यांचे आकांडतांडव सुरू आहे. त्याकडे राज्यातील जनता लक्ष देत नसल्याने 'महात्मा' नारोबांसारखे भाडोत्री लोक भाजपकडून शिवसेनेवर सोडले जात आहे. मात्र याच भाडोत्री लोकांनी भाजपलाच नागडे करून सोडले असं सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी म्हटले आहे.

'नॉर्मल' नसलेल्या नारायण राणेंनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना 'मारहाण' करण्याची बेलगाम भाषा केली, अशा उपटसुभांना भाजपने मांडीवर घ्यावं हे भाजपच्या संस्काराचं अधपतन असल्याचे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. मुख्यमंत्रीपद ही व्यक्ती नसून घटना व संसदीय लोकशाहीचे कवच असलेली संस्था आहे. आणि महाराष्ट्र असा व्यक्तीबाबत अशी भाषा सहन करणार नाही.

केंद्रीय मंत्री नारोबा राणे यांनी शपथग्रहण केल्यापासून जे दिवे पेटवले त्यामुळे केंद्रातील सरकारची देखील मान शरमेने खाली झुकली आहे असं सामनात म्हटले आहे.

दरम्यान संस्कारी राजकारणी अशावेळी महाराष्ट्राची माफी मागून मोकळे झाले असते. कारण महाराष्ट्राच्या अस्मितेपुढे कोणीही मोठे नाही, पण भाजपसाठी महाराष्ट्राची अस्मिता आणि मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा हे गौण विषय आहेत असं सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

Updated : 25 Aug 2021 3:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top