शिवसेनेत नाराजीनाट्य, काही आमदार नॉटरिचेबल?
महाविकास आघाडीचे टेन्शन वाढले...शिवसेनेचे काही आमदार संपर्क क्षेत्राच्या बाहेर...शिवसेनेची आज बैठक
X
विधान परिषद निवडणुकीच्या (MLC election ) निकालात शिवसेनेचे (Shivsena ) दोन्ही उमेदवार निवडून आले असले तरी पक्षाची काही मतं फुटल्याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे काही आमदार (Shivsena MLa) नाराज असून ते सोमवारी संध्याकाळपासून नॉटरिचेबल असल्याची चर्चा आहे. एबीपी माझा, झी चोवीस तास यासह काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांचे समर्थक आमदार नॉटरिचेबल असल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीसाठी (#MahaVikasAghadi) ही मोठी चिंतेची बाब असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm udhav thackrey) यांचे अत्यंत विश्वासातील समजले जाणारे एकनाथ शिंदे हे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातच आता त्यांचे समर्थक आमदार नॉटरिचेबल आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर बैठक घेतली. या बैठकीला पक्षाचे सर्व आमदार उपस्थित नव्हते. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी निकालानंतर एक ट्विट करुन विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्राच्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे श्री.सचिन आहिर आणि श्री.आमश्या पाडवी यांची विधान परिषदेच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!#Shivsena@ShivSena @AhirsachinAhir
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 20, 2022
संपर्कात नसलेल्या आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. रात्री दोन वाजेपर्यंत वर्षावर बैठक सुरू होती, अशीही माहिती मिळते आहे. दरम्यान शिवसेनेच्या आमदारांची मंगळवारी पुन्हा बैठक बोलवण्यात आली आहे. दुपारी 12 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीला पक्षाचे किती आमदार उपस्थित राहतात यावर महाविकास आघाडीचे भवितव्य अवलंबून असल्याचे सांगितले जाते आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रात्री उशिरा भेट घेतल्याची चर्चा आहे.