Home > Politics > उध्दव ठाकरे गटाचे खासदार घेणार लोकसभाध्यक्षांची भेट

उध्दव ठाकरे गटाचे खासदार घेणार लोकसभाध्यक्षांची भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने गटनेता म्हणून राहूल शेवाळे यांची निवड केल्याचे पत्र दिले. त्याला लोकसभाध्यक्षांनी मंजूरी दिली. मात्र त्यावरून नव्या वादाला तोंड पडले आहे.

उध्दव ठाकरे गटाचे खासदार घेणार लोकसभाध्यक्षांची भेट
X

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होण्यापुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने आपल्याला 12 खासदारांचा पाठींबा असल्याचे सांगत राहुल शेवाळे यांची गटनेते पदी नियुक्ती करण्याबाबत लोकसभा अध्यक्षांना पत्र दिले. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी उध्दव ठाकरे यांच्या गटाचे म्हणणे जाणून न घेता राहुल शेवाळे यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्याची मागणी मान्य केली. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांवर पक्षपातीपणाचा आरोप करत शिवसेनेतील उध्दव ठाकरे गट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेणार आहे.

18 जुलै लोकसभा सचिवालयाने प्रसिध्द केलेल्या यादीत गटनेते म्हणून राहुल शेवाळे यांचे नाव टाकण्यात आले आहे. मात्र शिंदे गटाने 19 जुलै रोजी पत्र दिले होते. त्यामुळे शिंदे गट शिवसेनेच्या गटनेतेपदी राहुल शेवाळे यांची निवड करणार असल्याचे स्वप्न लोकसभा सचिवालयाला पडले होते का? असा सवाल विनायक राऊत यांनी उपस्थित केला. तर लोकसभा अध्यक्षांनी पक्षपातीपणाची भूमिका घेतल्याचा आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेतून केला होता. त्यानंतर आता शिवसेनेतील ठाकरे गटाचे खासदार लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत. तर आमची बाजू ऐकून घेतली नसल्याबाबत अधिकृत पत्र देणार आहेत.

राहुल शेवाळे यांचे आरोपांना प्रत्युत्तर

शिवसेनेतील बंडानंतर आदित्य ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत राज्यभरात दौरे सुरू केले आहेत. या दौऱ्यांदरम्यान आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बंडखोर आमदार आणि खासदारांवरही जोरदार प्रहार केले आहेत. शिवसेनेत बंड नाही तर गद्दारी झाली, अशी टीका आदित्य ठाकरे सातत्याने करत आहेत.

पण आता आदित्य ठाकरे यांच्या या टीकेला बंडखोर खासदार राहुल शेवाळे यांनी उत्तर दिले आहे. दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरे यांना आव्हान दिले आहे. तसेच आदित्य ठाकरे भाजप सेनेच्या मतांमुळे जिंकून आले आहेत याची आठवण त्यांनी करुन दिली. तसेच आदित्य ठाकरेंना हरवण्याचा प्रयत्न काँग्रेस राष्ट्रवादीनं प्रयत्न केला, पण भाजपची साथ सोडून आदित्य ठाकरे राष्ट्रवादी सोबत गेले, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

एवढेच नाही तर गद्दार कोण आहे याचे उत्तर हे वरळी विधानसभेतील मतदार देतील, असा इशारा देखाली राहुल शेवाळ यांनी दिला आहे. त्याचबरोबर गटनेता निवडण्यात लोकसभा अध्यक्षांनी घाई केल्याचा विनायक राऊत यांचा आरोपही राहुल शेवाळे यांनी फेटाळला आहे. "आम्ही कायदेशीर बाबी पूर्ण केल्या आहेत, सर्व खासदारांनी ठराव मांडल्यानंतर गटनेत्याचा निर्णय झाला" असे राहुल शेवाळे यांनी सांगितले आहे. एवढेच नाही तर विनायक राऊत आणि अरविंद सावंत यांनी आमच्यावर अन्याय केला, महत्त्वाच्या विषयावर आम्हाला संसदेत बोलू दिले नाही, असा आरोपही शेवाळे यांनी केला आहे.

Updated : 22 July 2022 7:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top