Home > Politics > #Asembly पहिल्यांदाच शिवसेनेचे विधिमंडळ कार्यालय सील, नव्या वादाला तोंड फुटले

#Asembly पहिल्यांदाच शिवसेनेचे विधिमंडळ कार्यालय सील, नव्या वादाला तोंड फुटले

#Asembly पहिल्यांदाच शिवसेनेचे विधिमंडळ कार्यालय सील, नव्या वादाला तोंड फुटले
X

विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे यांची शिवसेना असा संघर्ष सभागृहात दिसून आला. शिवसेना पक्ष नेमका कोणाचा? असा वाद रंगलेला असतानाच शिवसेनेचे विधिमंडळ कार्यालय सील करण्यात आल्याचे मॅक्स महाराष्ट्राच्या निदर्शनास आले.आज विधानसभा अध्यक्षांची निवडणूकीत एकनाथ शिंदे गट व शिवसेना या दोघांकडूनही व्हीप जारी करण्यात आले होते.

शिवसेनेकडून सुनील प्रभू यांनी राजन साळवी यांना मतदान करण्याच्या आदेशाचा व्हीप जारी केला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटातील भरत गोगावले यांनी भाजपचे राहुल नार्वेकरांना मतदान करण्याच्या आदेशाचा व्हीप जारी केला आहे. यादरम्यान शिवसेनेचा विधिमंडळ कार्यालय सील करण्यात आल्याने मोठा वाद पेटण्याची शक्यता आहे. कारण याअगोदर झालेल्या शिवसेनेतील कोणत्याही बंडामध्ये विधानभवनातील शिवसेनेचे कार्यालय सील करण्यात आले नव्हते.

एका मोठ्या राजकीय नाट्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यानंतर जवळपास दोन तृतीयांश ३९ आमदारांची संख्या घेऊन ते सरकारमधून बाहेर पडले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. आता एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हात मिळवत सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकी अगोदरच विधानसभा उपाध्यक्षांच्या आदेशाने कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण सांगत शिवसेनेचे कार्यालय सील केल्याचे उघड झाले.





आज विधानसभेत विधानसभा अध्यक्ष पदाची निवड झाली त्यामध्ये राहुल नार्वेकर हे भाजपचे उमेदवार 165 मतं घेऊन निवडून आले. शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या वतीने बंडखोर आमदारांवर कारवाईची मागणी उपाध्यक्ष आणि अध्यक्षांकडे करण्यात आली आहे.

नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदी गेल्याने त्यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून महाविकास आघाडी सरकार व राज्यपाल यांच्यातील वादामुळे हे पद रिक्तच राहिले आहे. त्यानंतर आता या पदासाठी भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडी कडून शिवसेनेचे नेते राजन साळवी हे रिंगणात उतरले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सातत्याने फुटीर शिंदे गटच शिवसेना असल्याचा दावा केला जात होता तर विरोधी बाकांवरनं आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटासोबत असलेले 16 आमदार आमची शिवसेना खरी असल्याचा दावा करत होते या पार्श्वभूमीवर आता विधानसभा अध्यक्ष आणि सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Updated : 3 July 2022 10:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top