शिवसेनेत मुख्यमंत्रीपदासाठी स्पर्धा? एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी लावलेले बॅनर चर्चेत
X
राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार अशी चर्चा सुरू झाली होती, अखेर शरद पवार यांच्या आग्रहाखातर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासाठी होकार दिला. त्यानंतर ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती मुख्यमंत्री पदावर बसली. पण गेल्या काही महिन्यात उद्धव ठाकरे यांची प्रकृती बरी नसल्याने विविध चर्चा सुरू असतात. मुख्यमंत्र्यांच्या मानेवरील शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते अजून पूर्णपणे कार्यरत होऊ शकलेले नाहीत. हिवाळी अधिवेशनाचही ते अनुपस्थित राहिले होते. त्यामुळे विरोधकांनी मुख्यमंत्रीपदी वेगळ्या व्यक्तीची नेमणूक करण्याची मागणी केली होती.
या सर्व पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी केलेल्या बॅनरबाजीने जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिंदे यांच्या समर्थकांकडून भावी मुख्यमंत्री अशी बॅनरबाजी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांचा ९ फेब्रुवारी रोजी वाढदिवस असतो. यानिमित्त ठाण्यात बॅनर झळकत आहेत. ठाण्यातील वागळे इस्टेटमधील चेकनाका येथे एकनाथ शिंदे यांना भावी मुख्यमंत्री म्हणणारे बॅनर शिवसैनिकांनी लावले आहेत. अशाच प्रकारचा एक बॅनर विधानसभा निवडणुकीनंतर देखील लागला होता. पण आता एकनाथ शिंदे यांचे कार्य आणि जनतेशी असलेले त्यांचे नाते पाहता ते भविष्यात मुख्यमंत्री होतील, असा विश्वास त्यांचे समर्थक विजय यादव यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऑपरेशनमुळे मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता कार्यभार एकनाथ शिंदे यांच्याकडे दिला जाणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी स्वत: एक निवेदन प्रसिद्ध केले होते. तसेच असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले होते. पण आता एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी पुन्हा एकदा बॅनरबाजी केल्याने वेगळी चर्चा सुरु झाली आहे.