Home > Politics > शिवसेनेच्या निशाण्यावर पुन्हा मोदी

शिवसेनेच्या निशाण्यावर पुन्हा मोदी

राज्यातील सत्तानाट्यावर अखेर पडदा पडल्यानंतर शिवसेनेने आपला मोर्चा पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्याकडे वळवला आहे.

शिवसेनेच्या निशाण्यावर पुन्हा मोदी
X

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्तानाट्य सुरू होते. त्यामुळे बहुमताच्या चाचणीनंतर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येऊस्तोवर सत्तानाट्यावर पडदा पडला आहे. दरम्यान घरगुती गॅसच्या दरात 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यावरून शिवसेनेने पुन्हा एकदा आपला मोर्चा मोदी सरकारकडे वळवला आहे.

राज्यातील सत्तानाट्यानंतर शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सामनाच्या अग्रलेखातून प्रहार केले होते. त्यानंतर आता शिवसेनेने आपला मोर्चा केंद्र सरकारकडे वळवला आहे. त्यातच सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, घरगुती गॅसच्या दरात 50 रुपयांची वाढ करण्यात आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारने आपण पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करणार असल्याची शेखी मिरवली होती. मात्र सध्या जनता महागाईने भरडली जात असताना भाजप राजकारण करण्यात व्यस्त असल्याचा टोला सामानातून लगावला आहे.

सामनातून पुढे म्हटले आहे की, केंद्र सरकार देशातील विरोधकांची सरकारं अस्थिर करण्यात व्यस्त आहे. देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. मात्र चिंतामग्न असलेल्या सामान्य माणसांची काळजी राज्यकर्त्यांना राहिली नाही. घरगुती गॅसच्या दरात 50 रुपयांनी वाढ केली आहे. तर नव्या जोडणीसाठी 750 रुपये प्रति सिलेंडरची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे जुने ग्राहक असो वा नवे महागाईचे चटके सर्वांना सहन करावेच लागणार आहेत.

महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. त्यातच गेल्या तीन महिन्यात गॅस दरवाढीचा दुसरा विक्रम आहे. तर मसाल्याचे पदार्थ यांच्या किंमती, खाद्यतेलाचे दर यांनीही उच्चांक गाठला आहे. तर त्यांच्या उत्पादनांच्या किंमती स्थिर ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे पामतेल, खाद्य तेलाचे दर कमी होऊनही त्याचा कुठलाच फायदा सामान्य नागरिकांना झाला नाही, असेही सामनाच्या अग्रलेखातून म्हटले आहे.

तसेच पुढे म्हटले आहे की, राज्यात बेईमानीने स्थापन झालेल्या सरकारने विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी पेट्रोल डिझेलवरील कर कमी करण्याची शेखी मिरवली होती. त्याचा दिलासा मिळणार अशी आशा होती. मात्र त्या दिलाशाचं सोडा आता घरगुती गॅसच्या दरातही वाढ करुन सामान्य माणसाला तडाखा दिला आहे, असा टोला लगावत चिंतामग्न जनता आणि आत्ममग्न सरकार अशी टीका सामनातून केली आहे.

Updated : 7 July 2022 4:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top