"लॉकडाऊनचा मार ; त्यात दरवाढीचा भडीमार" ; सामनातून केंद्रावर निशाणा
वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून शिवसेनेने मोदी सरकारवर टीका करत "लॉकडाऊनचा मार ; त्यात दरवाढीचा भडीमार" असं म्हंटल आहे, सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे.
 X
X
मुंबई : देशात सध्या कोरोनाचे महाभयंकर संकट आहे, एकीकडे देश या संकटाचा सामना करत असताना दुसरीकडे महागाईने देशातील सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. याच मुद्द्यावरून शिवसेनेने आपले मुखपत्र असलेल्या सामनातून 'मोदी सरकार'वर जोरदार निशाणा साधला आहे."आधीच कोरोना आणि लॉकडाऊनचा मार; त्यात दरवाढीचा भडीमार" असं म्हणत सामनातून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आले आहे.
महागाईच्या या चक्रव्यूहातून देशातील जनतेला बाहेर काढायचे तर केंद्र सरकार हातावर हात धरून बसले आहे. त्यामुळे महागाईचा विळखा अधिकाधिक घट्ट होत जात असून, सामान्य जनांचा श्वास महागाईने गुदमरत आहे.असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
"मागील चार-पाच वर्षांपासून सतत वाढत असलेली महागाई रोखली कशी गेली नाही? पेट्रोल-डिझेल शंभरी पार कसे गेले? घरगुती गॅस सिलिंडर वर्षभरात तब्बल 165 रुपयांनी कसे महागला , गॅस सबसिडी का मिळत नाही?
हे आणि असे अनेक प्रश्न सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आले आहे. देशात बेरोजगारांची संख्या 23 कोटींपर्यंत कशी पोहोचली? देशाचा जीडीपी उणे 23 अंशापर्यंत कसा घसरला? या प्रश्नांचीही उत्तरे देशातील सामान्य नागरिकांना हवी आहेत" अशा शब्दांत समानातून केंद्रावर निशाणा साधण्यात आला. या सर्व मुद्द्यांवर केंद्र सरकार सोयीस्कर मौन बाळगत असून, कधी आधीच्या काँग्रेस सरकारांवर खापर फोडत असल्याचे सामनाच्या अग्रलेखात म्हंटले आहे.
















