Home > Politics > शिवसेना नगरसेवकांकडून कोपरगाव नगरपालिका कार्यालयात तोडफोड

शिवसेना नगरसेवकांकडून कोपरगाव नगरपालिका कार्यालयात तोडफोड

अतिक्रमित टपरी हटवल्याचा राग मनात धरून कोपरगाव नगपालिका कार्यालयात शिवसेना नगरसेवकांनी तोडफोड करत अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली.याबाबत कोपरगाव नगरपालिकेच्या उपमुख्याधिकाऱ्यांनी पोलिसांत फिर्याद देत गुन्हा दाखल केला.

शिवसेना नगरसेवकांकडून कोपरगाव नगरपालिका कार्यालयात तोडफोड
X

कोपरगाव शहरातील व्यापारी धर्मशाळेच्या भिंतीलगत असलेल्या लोखंडी पत्र्याची टपरी अतिक्रमण विभागाने हटवल्याने मनात राग धरुन शिवसेनेचे नगरसेवक योगेश बागुल, नगरसेवक कैलास जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी नगरपालिका कार्यालयात तोडफोड केल्याची घटना घडली. बालाजी गोर्डे यांची कोपरगावातील धर्मशाळेच्या भिंतीलगत पत्र्याची टपरी टाकण्याचे काम सुरू होते. मात्र नगरपालिका प्रशासनाला याची माहिती मिळताच त्यांनी सदरचे टपरी टाकण्याचे काम थांबविण्यात आले होते. मात्र अचानक ही टपरी अतिक्रमीत जागेत पुन्हा उभारण्यात आली. याची माहिती पालिका प्रशासनाला कळताच रात्री 11 वाजेच्या सुमारास पालिकेचे उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांनी त्यांच्या पथकासह जाऊन जेसीबीच्या साह्याने सदर टपरी काढून टाकली. यावेळी टपरी धारक तसेच पालिकेचे अधिकारी यांच्यात इतर टपऱ्या देखील अतिक्रमीत जागेत आहे. त्या का काढल्या नाही ? माझीच टपरी का काढली? कोणाच्या सांगण्यावरून काढली? असे म्हणत संबंधितांनी वाद घातला होता.



याचविषयावरून संतप्त झालेले शिवसेनेचे नगरसेवक योगेश बागुल, नगरसेवक कैलास जाधव, सनी वाघ, टपरी धारक बालाजी गोर्डे व इतर कार्यकर्त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत नगरपालिकेमध्ये तोडफोड केली. तसेच उपस्थित अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली अशी फिर्याद कोपरगाव पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली आहे. उपमुख्याधिकारी सुनील भाऊसाहेब गोर्डे यांच्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा आणणे, शासकीय अधिकाऱ्यास मारहाण करून शासकिय मालमत्तेचे नुकसान करणे या कारणावरून सनी रमेश वाघ, योगेश तुळशीदास बागुल, कैलास द्वारकानाथ जाधव , बालाजी पंढरीनाथ गोर्डे, साई पंढरीनाथ गोर्डे , निलेश पंढरीनाथ गोर्डे, आशिष निकुंभ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Updated : 23 July 2021 6:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top