Home > Politics > दसरा मेळावा : आता लढाई सर्वोच्च न्यायालयात, शिंदे गट देणार आव्हान

दसरा मेळावा : आता लढाई सर्वोच्च न्यायालयात, शिंदे गट देणार आव्हान

दसरा मेळावा :  आता लढाई सर्वोच्च न्यायालयात, शिंदे गट देणार आव्हान
X

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास मुंबई हायकोर्टाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला परवानगी दिली आहे. उद्धव ठाकरे गटातर्फे सध्या जल्लोष सुरू आहे. तर शिंदे गटासाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे. या पार्श्वभूमीवर आता शिंदे गटाने हायकोर्टाच्या या निर्णयाला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेने उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट अशा दोघांना दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यास मनाई केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाने या निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव घेतली होती. या लढाईत ठाकरे गटाला कोर्टाने दिलासा देत शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. या याचिकेवर हायकोर्टात शुक्रवारी सुनावणी झाली. दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तीवाद झाला. यानंतर महापालिकेने दोन्ही गटांना परवानगी नाकारण्याचा महापालिकेचा निर्णय रद्द केला. तसेच ठाकरे गटाला परवानगी दिली.

पण आता शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची लढाई सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. शिंदे गट उच्च हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. सोमवारी शिंदे गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या शिवाजी पार्कवरील सभेचा निर्णय आता सर्वोच्च न्यायालयात होणार आहे.

शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर शिंदे गटाने देखील शिवसेनेचा दसरा मेळावा करण्यासाठी शिवाजी पार्कवर परवानगी मागितली होती. तर उद्धव ठाकरे यांनीही येथे आम्हीच दसरा मेळावा घेणार अशी भूमिका घेतल्याने संघर्ष निर्माण झाला होता. त्यानंतर महापालिकेने पोलिसांच्या अहवालाचा हवाला देत दोन्ही गटांना परवानगी नाकारली होती. त्यानंतर हायकोर्टात झालेल्या सुनावणीमध्ये कोर्टाने महापालिकेला फटकारले. तसेच २ ते ६ ऑक्टोबर दरम्यान मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. राज्यसरकारने आपल्या निर्णयात याआधीच वर्षातील ४५ दिवसांपैकी काही दिवस शिवाजी पार्कवर उत्सव घेण्याची परवानगी दिली आहे. तसेच त्या मैदानावर शिवसेनेला परवानगी देण्यात येत होती, असे सांगत कोर्टाने ठाकरे गटाला दिलासा दिला आहे.


Updated : 23 Sep 2022 2:54 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top