Home > Politics > नाना पटोलेंच्या आरोपांवर शरद पवार नाराज, काँग्रेस नेत्यांकडे व्यक्त केली नाराजी

नाना पटोलेंच्या आरोपांवर शरद पवार नाराज, काँग्रेस नेत्यांकडे व्यक्त केली नाराजी

नाना पटोलेंच्या आरोपांवर शरद पवार नाराज, काँग्रेस नेत्यांकडे व्यक्त केली नाराजी
X

मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या आरोपांमुळे शरद पवार नाराज आहेत. एवढेच नाही तर शरद पवार यांनी काँग्रेसच्या नेत्यांकडे आपली नाराजी देखील व्यक्त केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील, मंत्री अशोक चव्हाण आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांची मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमध्ये शरद पवार यांनी नाना पटोले यांच्या वक्तव्यावर स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या बैठकीला नाना पटोले उपस्थित नव्हते.

काँग्रेसला स्वतंत्र लढायचे असेल त्यांनी आधीच सांगावे म्हणजे आम्हालाही तशी तयारी सुरू करता येईल, तसा निर्णय दिल्लीमधून घेतला गेला असेल किंवा नाना पटोले यांना अधिकार देण्यात आले आहे का तसेही स्पष्ट करावे या शब्दात शरद पवार यांनी आपली नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळते आहे. आपापला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न कोणताही नेता करेल याबद्दल कुणाचेही दुमत नाही. पण आपल्या सोबतच्या इतर पक्षांची प्रतीमा खऱाब करणे योग्य नाही, असेही शरद पवार यांनी सुनावल्याचे समजते आहे.

काय म्हणाले होते नाना पटोले?

मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आपल्यावर पाळत ठेवून आहेत आणि फोन टॅपिंग केले जात आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला होता. आपण स्वबळाची घोषणा केल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली आहे, म्हणून आपल्यावर पाळत ठेवली जाते, असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी लोणावळा इथे कार्यकर्त्यांशी बोलताना केला होता. स्वबळाची घोषणा मागे घेणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले होते.

नाना पटोले यांच्या या वक्तव्यावर शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता. नाना पटोलेसारख्या छोट्या माणसाच्या वक्तव्यावर आपण प्रतिक्रिया देणार नाही, असे शरद पवार यांनी म्हटले होते. पण आता पवारांनी काँग्रेस नेत्यांकडेच याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. आता येत्या काळात नाना पटोले काय भूमिका मांडतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Updated : 14 July 2021 7:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top