Home > Politics > पंतप्रधान मोदींच्या सभेत संघाच्या काळ्या टोपीवर बंदी का?- शिवसेनेचा सवाल

पंतप्रधान मोदींच्या सभेत संघाच्या काळ्या टोपीवर बंदी का?- शिवसेनेचा सवाल

पंतप्रधान मोदींच्या सभेत संघाच्या काळ्या टोपीवर बंदी का?- शिवसेनेचा सवाल
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच आपल्या लोकसभा मतदारसंघाचा म्हणजेच वाराणसीचा दौरा केला. या दौऱ्यात पंतप्रधानांची एक सभाही झाली. पण या सभेपूर्वी पंतप्रधानांच्या सुरक्षा रक्षकांनी सभेला आलेल्या लोकांच्या चेहऱ्यावरचे काळे मास्क, संघाच्या स्वयंसेवकांच्या डोक्यावरील काळ्या टोप्याही काढायला लावल्या. सुरक्षेचे कारण देत ही बंदी घालण्यात आली होती. पण आता यावरुनच शिवसेनेने सामनामधून काही सवाल उपस्थित केले आहेत. सामनाच्या अग्रलेखात नेमके काय म्हटले आहे ते पाहूया....

"सध्या आपल्या देशात सुरक्षेच्या नावाने अतिरेकच सुरू आहे. बरे, ही सुरक्षा कोणाची, तर देशातील पाच-दहा प्रमुख सत्ताधारी राजकीय मंडळींची (काही धनदांडग्यांचीही). पंतप्रधान, राष्ट्रपती, गृहमंत्री यांच्या सुरक्षा व्यवस्थेस प्राधान्य द्यायला हवेच. मात्र अति तेथे माती झाली तर तो टवाळखोरीचाच विषय होतो. आता आपले पंतप्रधान मोदी हे आपल्या स्वतःच्या मतदारसंघात म्हणजे वाराणसीला गेले. तेथे त्यांनी योगी आदित्यनाथ यांचे 'जमकर' कौतुक केले. योगी महाराजांनी कोरोनाची दुसरी लाट कशी हिमतीने रोखली वगैरे जाहीरपणे सांगितले (गंगेत कोरोनाग्रस्तांची प्रेते वाहत होती हे विसरून जा.) पंतप्रधान मोदींचे भाषण वाराणसी येथील बीएचयू, आयआयटी मैदानावर झाले. तेथे काळे कपडे घातलेल्या लोकांना प्रवेशबंदी करण्यात आली. आश्चर्य असे की, पोलिसांनी श्रोत्यांच्या तोंडांवरील काळे मास्कही काढायला लावले. म्हणजे त्या गर्दीत बरेच लोक 'मास्क'शिवाय बसले. कारण तोंडावरचे काळे मास्क खेचून काढले. काळे मास्क काढण्याचे कारण काय? तर पंतप्रधानांची सुरक्षा!

वाराणसीच्या या सोहळय़ात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोकही त्यांच्या गणवेषात मोठय़ा कौतुकाने हजर होते. त्या स्वयंसेवकांच्या डोक्यावरच्या काळय़ा टोप्याही सुरक्षा रक्षकांनी काढायला लावल्या. पंतप्रधानांनी काही वर्षांपूर्वी मंत्र्यांच्या डोक्यावरची लाल बत्ती काढली. हे काही बरे झाले नाही. आता सुरक्षा रक्षकांनी संघाची काळी टोपी काढली. पंतप्रधानांच्या सुरक्षेत कोणतीही खोट असू नये,पण तोंडावरील मास्क व डोक्यावरील काळय़ा टोप्याही काढायला लावणे हा प्रकार जरा जादाच झाला, असे कदाचित पंतप्रधान मोदींनाच वाटले असेल. मास्कच्या आड आणि काळय़ा टोपीखाली दडलंय काय, असा प्रश्न पंतप्रधानांच्या सुरक्षा यंत्रणेस पडला असावा. हे सर्व उपद्व्याप करण्याआधी सरकारने एकच करावे, एक अध्यादेश काढून काळे मास्क व काळय़ा टोप्या यावर बंदीच घालावी." असा टोला सामनामधून शिवसेनेने लगावला आहे.

Updated : 17 July 2021 2:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top