Home > Politics > विश्लेषण : ऑपरेशन लोटस"ची तयारी अनेक वर्षापासून?

विश्लेषण : ऑपरेशन लोटस"ची तयारी अनेक वर्षापासून?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध झालेले बंड कशाची परिणती आहे, भाजपने ऑपरेशन लोटस अनेक वर्षांपासून सुरू केले होते का? उद्धव ठाकरे यांचे यामध्ये नेमके काय चुकले आहे, या सगळ्याचे विश्लेषण करणारा पत्रकार रफ़ीक मुल्ला यांचा लेख

विश्लेषण :  ऑपरेशन लोटसची तयारी अनेक वर्षापासून?
X

शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाची स्क्रिप्ट शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचीच आहे, किंवा भाजपसोबत अंतर्गत संधान बांधून शरद पवार या सगळ्यामागे असतील अशा आशयाचे बरेच पतंग उडत आहेत. पण या सगळ्या नाट्याची पटकथा ही वर्षानुवर्षे लिहिली जात होती. मुख्यत: भाजप शक्तीशाली झाल्यावर आणि राज्यात पक्षाला देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा नेता मिळाल्यावर या प्रक्रियेला वेग आला,. इतका की बाळासाहेबांसारख्या जाज्वल अजरामर नेत्याचे सगळे वाघ त्यांच्या वारसाला सोडून गेले. बाळासाहेबांनी शेवटच्या दसरा मेळाव्यात घरातून केलेल्या भाषणात शिवसैनिकांना जाहीर आवाहन केले होते..

" आज मला वचन हवं आहे, जसं मला सांभाळलंत, तशी साथ उद्धवलाही द्या..." पण वेळ आली तेव्हा तशी साथ काही कुणी दिली नाही, १०० वर्षे जुन्या असलेल्या काँग्रेसला आमदार सांभाळता येत नाहीत, त्यामुळे अनेक राज्यातली हातातील सत्ता घालवून बसले. हे आपण पाहिलेच पण इथे तर सगळा विधिमंडळ पक्षच पळून गेला. सत्तेतल्या पक्षाचा प्रभाव असतो, त्याचा सहज फायदा मिळ्तो, पण आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री तो ही पक्षप्रमुख, खाली खेचा आणि दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्री करा हे सांगणारा विधिमंडळ पक्ष म्हणजे आठवं आश्चर्यच..! शिवसेनेतून फुटणं म्हणजे मरण..! शिवसेनेशी गद्दारी करणारा उद्ध्वस्तच होणार..अशी धगधगती स्थिती ठेवणारा हा पक्ष, आज त्याच पक्षावर अशी वेळ यावी यापेक्षा दुर्दैव ते काय..!! खरं तर ही वेळ नेमकेपणाने साधली गेलीय..सगळी ताकद लावून सरकारवर तुटून पडलेल्या भाजपने आता पत्ते बाहेर काढलेत, जोकर त्यांच्या हाती आहे..

उद्धव ठाकरे यांचे काही चुकले का?

आज जे घडतंय ते कुणामुळे आणि का..?! या प्रश्नाचे उत्तर या घडीला द्यायचे झाले तर उद्धव ठाकरे यांच्यामुळेच असं पहिल्यांदा सांगावे लागेल, शिवसैनिक निष्ठावान असतो, बाळासाहेबांच्या पुण्याईमुळे बंड होणार नाही हे गृहित धरल्यामुळे हे पाहणं त्यांच्या नशिबी आलंय. आज भाजप का कॉंग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेसाठी धोकादायक आहे, त्यांना जो अंदाज त्यांना आलाय तो एकनाथ शिंदेसह त्यांच्या पक्षाच्या कुणा आमदाराला अद्याप येऊ शकलेला नाही आणि त्याबाबत उद्धव ठाकरे आपल्या लोकांना पूर्णत: पटवू शकले नाहीत, त्यामुळेही ही स्थिती आलीय.

अजित पवारांची ढवळाढवळही कारणीभूत?

देवेंद्र फडणवीस यांची कार्यपद्धती, मुख्यमंत्री म्हणून केलेली कामगिरी आणि ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचासाठी राज्यातले परफेक्ट 'पॉईंट पर्सन' बनल्यामुळेही आज असा राजकीय पट मांडला गेलाय. सरकारमध्ये सगळ्या विभागात ढवळाढवळ करुन अजित पवार यांनी केलेल्या दादागिरीमुळेही ही महविकास आघाडीवर ही वेळ आलीय. आमदार विशेषत: एकनाथ शिंदे नाराज आहेत याची कल्पना उद्धव ठाकरेंना होती. मात्र ते गाफिल राहिले. कारण एक तर एकनाथ शिंदेसारखा मवाळ, संयमी नेता असे काही करणार नाही. मुलगा खासदार, घरात पदं-सत्ता असताना गप्प राहण्यावाचून त्यांच्याकडे पर्याय नाही असं त्यांना वाटत राहिले. बाळासाहेबांच्या प्रेमापुढे देवेंद्रप्रेमाचे पारडे जड होणार नाही, झालेच तर, फार काय तर चार आठजण घेऊन तोंड फोडून घेतील, असा चुकीचा अंदाज त्यांनी बांधला. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर काही आमदारांसमोर त्यांनी एकनाथ शिंदे यांना थेट तसे सुनावलेही होते.

आदित्य ठाकरेंशी शिंदे यांचे बिनसले

एक दोन प्रसंगी आदीत्य ठाकरेंशीही त्यांचे बिनसले होते. हे गृहित धरणं त्यांना बाधलं. बाळासाहेबांसारखा स्वभाव नसल्याने आक्रमक संघटना उद्धव ठाकरेंनी मवाळ केली, केडर सांभाळण्यासाठी त्यांची भाषा मात्र आक्रमक राहीली. अनेक आघात सहन करुनही पक्ष टिकला, नंतर मात्र त्यांच्या प्रकृतीच्या समस्या वाढल्यावर आदित्य ठाकरे संघटनेत बरेच निर्णय घेऊ लागले. त्यांनी पक्ष आणखी मवाळ केला. अगदी कार्पोरेट पोरं गंडे घालुन शिवसैनिक झाले. राकट शिवसैनिक गोंधळून गेले पण बाळासाहेबांच्या प्रेमापोटी तेही नव्या वातावरणात रुळले. उद्धव ठाकरे यांचा लहान मुलगा तेजसला २०२४ मध्ये लॉन्च करुन संघटना आक्रमक करण्याचे नियोजन होते. बाळासाहेबच एकदा म्हणाले होते..." तेजस माझ्यासारखा आहे,अगदी रोखठोक.." पण त्याआधीच शिवसेनेच्या वाघांनी 'गुजरातच्या ढोकळ्या'ची ऑर्डर दिली ...!!

मोदी सत्तेत आल्यानंतर भाजप आणखी आक्रमक

भाजपचे कायमच 'शत प्रतिशत' चे धोरण राहिले आहे. प्रत्येक राज्यात सहयोगी पक्षात घुसणे, तिथली माणसं आपलीशी करणं, इतकी की आपल्या रंगात रंगवून टाकणे ही भाजपची निती राहीली आहे, महाराष्ट्रातही प्रमोद महाजन यांच्या काळातच शत प्रतिशतचे नारे दिले गेले होते. बाळासाहेब होते त्यामुळे वेगाला संधी मिळाली नाही. मोदी पर्व आल्यावर मात्र पक्षाने प्रचंड वेग घेतला. पक्षाची हवा आणि निवडून येण्याची क्षमता असलेले ठोकळ चेहरे घेऊन २०१४ च्या निवडणुकीत १२३ अशा मोठ्या संख्येने भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष बनला.

देवेंद्र फडणवीसांनी आपला प्रभाव कसा वाढवला?

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यांनी सगळ्यांचा अंदाज खोटा ठरवला. सुरुवातीला ब्राह्मण म्हणून मराठा बहुल बहुजनवादी राज्यात बुजणाऱ्या फडणवीसांनी सगळ्या प्रकारचे लोक जोडत आपली एक टीम निर्माण केली. जसे जसे ते मुख्यमंत्री म्हणून रुळत गेले आपल्या टिमला ताकत देत गेले. बाहेरचे आणि आतले विरोधक संपत-संपवत गेले, प्रत्येक पक्षातले उपयोगी लोक हेरले, त्यांची कामे केली. त्यांनी पाच वर्षाच्या काळात आमदार, नेते, पत्रकार आदी सगळ्या स्तरावर माणसं जोडली. उदार मुख्यमंत्री अशी ओळख निर्माण केली. उशिराने सरकारमध्ये सामील झालेल्या शिवसेनेची कमकुवत ठिकाणं त्यांना माहिती होतीच, ती अधिक स्पष्टपणे पाहिली. सेनेला आता आपली गरज आहे असे मानून नियोजन केले, शिवसेनेतले अनेक नेते गळाला लावले. त्यांची कामे केली, निवडून येण्याची स्वत:ची क्षमता असलेल्या आमदारांना जोडले. शिवसेनेचे अनेक मंत्री पहिल्या खेपेतही कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांचे अधिक ऐकताना दिसायचे. पक्षाध्यक्ष आदेश देत की मंत्रीमंडळाच्या बैठकीत तत्कालीन धोरणात्मक विषय घेऊन आक्रमक व्हा..पण रामदास कदम वगळता सगळे नांगी टाकत..बाहेर माध्यमांना बाईट मात्र वेगळा देत असत. सुभाष देसाई, दिवाकर रावते, दीपक सावंत, एकनाथ शिंदे तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्याशी फार एकरुप होऊन गेले होते, इतके की आपल्या पक्षाचे हित विसरले होते, विविध ठिकाणी अधिकाराच्या मुद्यावर पक्षाचा अपमान झाला तरीही हे मंत्री गप्प राहत. मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या एका जागेवर पक्षाने अनिल परब यांना मंत्री करण्यास सांगितले तेव्हा ते नकोत त्यांच्याऐवजी सुनिल प्रभूंना घेतो असा निरोप देवेंद्र फडणवीस यांनी पाठवला. स्थिती कुठपर्यंत गेली होती, हे समजण्यास एवढे उदाहरण पुरेसे आहे. सत्तेत अत्यंत कमी वाटा, तुटपुंजी मंत्रीपदं, वरुन अपमान आणि ढवळाढवळ...अशी कोंडी झालेली असतानाही उद्धव ठाकरे शांत राहिले कारण त्यांना तेव्हाच शिवसेना फुटण्याची भीती होती.

उद्धव ठाकरे फडणवीस यांच्यावर नाराज का होते?

परिस्थितीचे गांभीर्य पाहून ते शांत राहिले, तेव्हा महापौर बंगल्यावर मागच्या बाजूला समुद्रकिनारी त्यांच्याशी गप्पा मारण्याचा योग आला. वरिष्ठ पत्रकार अनंत सोनावणे सोबत होते, आम्ही तिघेच..फार वेळ विविध विषयांवर बोललो. भाजपबद्दलचा त्यांचा द्वेष कोणत्या पातळीवर गेलाय याचा अंदाज तेव्हाच आला होता. त्यानंतर त्यांनी दोन्ही काँग्रेस बरोबर हातमिळवणी केल्याच्या निर्णयाचे अजिबात आश्चर्य वाटले नाही. अशा स्थितीतही २०१९ च्या निवडणुकीत युती झाली. आठ दहा जागांवर स्वत: खर्च करु शकतील अशा भाजपशी जवळीक असलेल्या उमेदवारांना शिवसेनेच्या तिकिटावर लढवण्याचा आग्रह झाला. खर्च वाचतोय म्हणून आणि तेव्हा काहीच पर्याय अथवा नियोजन नसल्याने उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा प्रस्ताव मान्य केला. त्यातले बरेच निवडून आले. सत्ता स्थापताना मात्र शिवसेनेने युती तोडून वेगळी वाट धरली आणि भाजपला धक्का दिला. भाजप आपला संपूर्ण पक्ष गिळंकृत करेल ही स्वाभाविक भीती वाटल्याने हे टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला. या निर्णयावेळी उद्धव, आदित्य ठाकरेंसह सुभाष देसाई, संजय राऊत आणि एकनाथ शिंदे उपस्थित होते. सगळ्यांनी मिळून भाजपच्या छ्त्र-छायेखाली शिवसेना संपवण्यापेक्षा त्यांचे खच्चीकरण करुन आपलं अस्तित्व दाखवायचे, असा निर्णय घेतला आणि शरद पवार यांच्या प्रेमात असलेल्या संजय राऊत यांच्यावर पुढील कामगिरी सोपवली. यावेळी सेनेला गृहित धरण्याची चूक भाजपने केली होती. राष्ट्रपती राजवट उठविण्यास अजित पवार यांचा वापर करण्यात आला, पहाटेचा शपथविधी करुन परतलेल्या अजित पवार यांच्या माध्यमातून पुन्हा भाजपला धक्का दिला गेला. अनपेक्षितपणे तीन पक्षाचे सरकार सत्तेत आले आणि रुळलेही...‌

विश्लेषण : ऑपरेशन लोटस"ची तयारी अनेक वर्षापासून?दरम्यानच्या काळात एका एका उपकृत फॅन आमदाराला साम दाम दंड भेदचा 'प्रसाद' देत 'फिट' करण्याचा कार्यक्रम सुरु झाला... तुलनेत सोपे असलेल्या, कात्रीत सापडलेल्या अजित पवार यांच्यावर दबाव टाकून पाहिला पण राष्ट्रवादीतून तेवढे संख्याबळ जुळत नव्हते आणि अजित पवारही गंडवत होते. सोबतच आमदारांच्या शरद पवार प्रेमामुळेही हा पर्याय यशस्वी झाला नाही.. तुलनेत भावनिक असलेले, एकेकाळी सामान्य असलेले, कसलीही पार्श्वभूमी नसलेले शिवसेना आमदार गळाला लागत गेले..त्यातच चौकशी यंत्रणांची भीती घेऊन कुढत दिवस काढण्यापेक्षा रंगात रंग मिसळून टाकू असा साधा विचार प्रभावी ठरला. संजय राऊत अनेकांना खटकत, कारण ते सरकारची बाजू जोरकसपणे मांडत, स्वत: पुढाकार घेऊन आलेल्या सरकारमध्ये भावाला मंत्रीपद न दिल्याने नाराज असूनही ते पक्षाची बाजू मांडत राहिले. दम देण्याची भाषा हे ठाकरी भाषा आणि शिवसेनेचा दबदबा ठेवण्याच्या प्रयत्नातून येत राहीली. पण स्थिती वेगळी होती, संघटन आणि कार्यकर्ते आक्रमक राहिले नसताना, कुणीही सोम्या गोम्या उठून टपली मारत असताना, कसलीच प्रतिक्रीया उमटत नाही, हे दिसल्यावर बहुतेकजण हिम्मत करु लागले, थेट उद्धव ठाकरे यांच्यावर चिंटे पिंटे वाटेल त्या भाषेत बोलू लागले. त्यामुळे अनेक आमदारांची भावना होत गेली की, हे सरकार बनवून चूक तर केली नाही ना..? 'झाकली मुठ सव्वा लाखाची होती', उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्रीपद घेतल्यावर अधिक उपलब्धता असती तरी फरक पडला असता.

छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक आदी नेत्यांची संस्थाने बनली आणि पक्षाला त्यांनी दिलेले हादरे पचवून पुढे जाणे जड गेले. यानंतर पक्षापेक्षा कुणी मोठा होऊ नये म्हणून रामदास कदम, एकनाथ शिंदे आदी मास बेस असलेल्या नेत्यांचे खच्चीकरण केले गेले. अगदी संजय राऊत यांनाही उद्धव ठाकरेंनी बाजूला ठेवले होते. पण सगळं सहन करुन, ते पक्षासाठी पुढे होऊन काम करत राहीले अन्यथा बाळासाहेबांनी दिलेल्या पहिल्या संधीनंतर ते संसदेत जाऊ शकले नसते आणि कदाचित दैनिक सामनाचे कार्यकारी संपादकही राहीले नसते. आपल्याला ओळख दिलेल्या पक्षासाठी नाराजी असली तरी झटले पाहिजे अशी स्वत:ची समजूत घालून त्यांनी उपयुक्तता सिद्ध केली म्हणून ते टिकले. वास्तविक सत्तेत नसतानाही ते सरकार आणि पक्षासाठी एकटे बोलत राहिले, विरोधक अंगावर घेत राहीले, राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि कॉंग्रेसचे सचिन सावंत एवढे आघाडीच्या वतीने लढत राहीले...बाकी सगळे सत्तेचे धनी होते आणि आहेत हे एवढे स्पष्ट झाले आहे..

पण कोणत्या कारणाने का असेना राजकारणात सगळे आपापला डाव खेळत असतात. ते स्वाभाविक आहे, राजकीय पक्षाने राजकारण नाही तर दुसरे काय करावे...! पण सगळा विधिमंडळ पक्षच निघून गेला आणि ते ही आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री असताना..असा प्रकार कधी झाला नाही आणि कदाचित होणारही नाही..पण हे घडलंय, यातून पुढे काय होईल हे सगळं समोर येईलच पण शिवसेना भाजपपासून वाचविण्यासाठी उचललेलं पाऊलच आज घातक ठरलंय, औषधच विष झाल्याचा प्रकार घडला. शिवसेनेची संघटना म्हणून बाळासाहेबांनी घडवलेली एक पिढी आहे, त्यामुळे हा जबर हादरा बसला तरी पक्ष संपला किंवा ठाकरे संपले असं म्हणणं चूक आणि घाईचे ठरेल. पण त्यांचा ठाकरी दबदबा मात्र या घटनेने पूर्णत: संपवलेला आहे. एक पक्ष म्हणून आता काम करायचे- वेगळी, फार ग्लॅमरस स्वतंत्र ओळख असलेला पक्ष म्हणून जी बाळासाहेबांनी शिवसैनिकांना घेऊन निर्माण केली होती, ती या घटनेने संपली. दुसरीकडे शिवसेनेच्या बंडखोरांची वाटचाल फार सोपी नसते, हे वेळोवेळी दिसले आहेच. इतर जनतेलाही अशा उड्यांचे प्रकार फार आवडत नाहीत..पण एक मात्र खरे, राज्याच्या अत्यंत बदललेल्या राजकीय स्थितीमध्ये भविष्याचे अंदाज आता फार सरळ सोपे राहिलेले नाहीत..! त्यामुळेच बहुदा सर्व माध्यमांच्या हेड़लाईन्स मध्ये ज्योतिषी घुसले आहेत..असं किवा तसं दोन्ही बाजूने ते बोलतात- यातलं नाही तर त्यातलं काही तरी आपोआप घडून खरं होतंच..! पत्रकारांपेक्षा राजकीय विश्लेषण करण्यास ज्योतिषी बसू लागलेत- हा बदलही स्थितीला साजेसा आहे..!

Updated : 24 Jun 2022 7:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top