Home > Politics > भाजपची माघार : राज्यसभा निवडणुक बिनविरोध

भाजपची माघार : राज्यसभा निवडणुक बिनविरोध

भाजपची माघार : राज्यसभा निवडणुक बिनविरोध
X

मोठी घोषणा करत जाहीर केलेली भाजपा उमेदवार संजय उपाध्याय यांची उमेदवारी भारतीय जनता पार्टीनं शेवटच्या क्षणी माघारी घेतल्यानंतर येत्या ४ ऑक्टोबर रोजी होणारी राज्यसभा पोटनिवडणुक बिनविरोध पार पडणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

कॉंग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी कॉंग्रेसकडून रजनी पाटील यांची उमेदवारी घोषीत करण्यात आली होती. त्याविरोधात भाजपकडून संजय उपाध्याय यांनी फॉर्म भरला होता. दरम्यान भाजपनं भारतीय निवडणुक आयोगाकडं जाऊन निलंबीत १२ आमदारांसाठी विधानभवनाबाहेर स्वतंत्र मतदानाची व्यवस्था करुन घेतली होती.

त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यासह कॉंग्रेसच्या नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. फडणवीसांना महाराष्ट्राच्या परंपरेची आठवण करुन देत पोटनिवडणुकीतील उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली होती.यावर फडणवीस यांनी कोर कमिटीशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल असा शब्द दिला होता. अखेर आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपने उमेदवारी माघारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपकडून पोटनिवडणूकीसाठी संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली होती. तर काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसंची विनंती भाजपकडून मान्य करण्यात आली असल्यामुळे आता रजनी पाटील बिनविरोध निवडून येण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

भाजपकडून राज्यसभा पोटनिवडणूकीतील अर्ज माघे घेण्यात आल्यामुळे रजनी पाटील यांचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या रजनी पाटील या राज्यसभेच्या माजी खासदार आहेत. तसेच सध्या त्यांच्याकडे जम्मू काश्मीरची प्रभारीपदाची जबाबदारी आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम आणि मध्य प्रदेशमधील रिक्त जागांवर राज्यसभा पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. या पोटनिवडणूकीचे मतदान ४ ऑक्टोबरला होणार असून निकालही त्याच दिवशी जाहीर करण्यात येणार आहे.

Updated : 2021-09-27T14:06:02+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top