Home > Politics > आधी राजीनामा द्या नंतर काय घाण करायची ती करा: राज ठाकरे कडाडले

आधी राजीनामा द्या नंतर काय घाण करायची ती करा: राज ठाकरे कडाडले

आधी राजीनामा द्या नंतर काय घाण करायची ती करा: राज ठाकरे कडाडले
X

गेल्या काही दिवसांपासून माध्यमांवर वाटेल ते बडबडणाऱ्या वाचाळवीरांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक पक्षांतील नेत्यांकडून महामानवांचा अपमान करण्याचे स्तर सुरू आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी पक्षांतर्गत वादावर थेट माध्यमांमध्ये येऊन आपले विचार मांडताना दिसत आहेत. अशाच काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विशेष पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना ताकीद दिली असल्याचे पाहायला मिळत आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत पत्र लिहीत म्हंटले आहे की, 'सध्या माध्यमांसमोर किंवा सोशल मीडियावर जाऊन वाट्टेल ते बोलायचं, प्रसिद्धी मिळवायची असं करणाऱ्या उथळवीरांची भरती सगळ्याच पक्षात दिसून येत आहे. माध्यमांनी दिलेली प्रसिद्धी आणि सोशल मीडियाचे लाईक्स ह्याच्याने हे सगळे शेफारले आहेत. इतर पक्षांनी अशा लोकांचं काय करावं हे त्यांनी ठरवावं, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत हे मी खपवून घेणार नाही.'

'माझ्या पक्षातल्या कोणालाही, पक्षांतर्गत बाबींवर काही म्हणणं मांडायचं असेल तर संबंधित नेत्यांशी बोला, माझ्याशी बोला. पण हे सोडून जर थेट माध्यमांशी बोलायचं असेल किंवा सोशल मीडियावर जाऊन गरळ ओकायची असेल, तर आधी राजीनामा द्या, मग काय घाण करायची आहे ती करा. पक्षात राहून असे प्रकार केलेत, तर हकालपट्टी अटळ आहे हे लक्षात ठेवा. ही समज नाही तर अंतिम ताकीद आहे ह्याची नोंद घ्या !' असा थेट धमकी वजा इशारा राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे.




दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मनसेमधील अंतर्गत वाद उफाळून आला असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. गेल्या वर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे शहराध्यक्ष पदावरून वसंत मोरे यांनी उचल बांगडी करण्यात आली होती. त्यानंतर वसंत मोरे हे पक्षश्रेष्ठींवर नाराज असल्याचे दिसून आले. त्यानंतर अनेकदा वसंत मोरे यांनी आपली नाराजी व्यक्त देखील केली आहे. नुकतच एक लग्नात वसंत मोरे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट झाली. त्यावेळी अजित पवार यांनी वसंत मोरे यांना हाक मारत 'तात्या येतंय ना, वाट बघतोय' असं म्हणत थेट राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाची ऑफर दिली होती. त्यानंतर वसंत मोरे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यामुळे आता थेट राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे पत्र लिहीत वसंत मोरे यांना इशारा दिला आहव का असा सवाल उपस्थित होत आहे.

Updated : 21 Dec 2022 12:45 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top