Home > Politics > राज्यसभेत अभूतपूर्व गदारोळ, राहुल गांधी यांचा मोर्चा

राज्यसभेत अभूतपूर्व गदारोळ, राहुल गांधी यांचा मोर्चा

राज्यसभेत अभूतपूर्व गदारोळ, राहुल गांधी यांचा मोर्चा
X

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची सांगता मोठ्या गदारोळाने झाली आहे. राज्यसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांना मार्शल बोलावून मारहाण करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. राज्यसभेत झालेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी, संजय राऊत यांच्यासह सर्व विरोधी पक्षांच्या खासदारांनी गुरूवारी दिल्लीत मोर्चा काढला. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी राज्यसभेत विमा सुधारणा विधेयक सादर करताना सभागृहात पुरूष आणि महिला मार्शल बोलावण्यात आले होते. यानंतर महिला मार्शल्सनी महिला खासदारांना धक्काबुक्की केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.



राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विजय चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला. बुधवारी राज्यसभेत खासदारांना मारहाण करण्यात आली, एवढेच नाही तर बाहेरून लोक बोलावून खासदारांना मारहाण करण्यात आली, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. पेगॅसस, महागाई, कृषी कायदे यांच्याबद्दल अधिवेशनात बोलण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे जनतेशी बोलण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. बुधवारी देशातील ६० टक्के जनतेचा आवाज दडपण्यात आला, ही लोकशाहीची हत्या आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.



शिवसेनेची राज्यसभेतील खासदार संजय राऊतही या मोर्चात सहभागी झाले होते. सभागृहात बाहेरच्या लोकांना मार्शलचे कपडे परिधान करुन आणले गेले. तसेच खासदारांवर हल्ला केला. आपण संसदेत नाही तर पाकिस्तानच्या सीमेवर उभे आहोत, असे वाटले, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. सैन्य बोलवावं अशा पद्धतीने मार्शल सभागृहात बोलावले गेले, तिकडे चीनची घुसखोरी थांबवता येत नाही पण इकडे पुरुष खासदारांसमोर महिला कमांडो उभ्या केल्या हा कुठला मर्दपणा आहे या शब्दात संजय राऊत यांनी टीका केली आहे.




दरम्यान राज्यसभेत बुधवारी झालेल्या गोंधळाच्या निषेधार्थ शरद पवार यांच्यासह विरोधी पक्षांच्या सर्व नेत्यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली. तसेच झालेल्या प्रकाराबाबत कारवाई करण्याची मागणी केली. आपल्या ५५ वर्षांच्या संसदीय कारकिर्दीमध्ये आपण असा गोंधळ पहिल्यांदाच पाहिला, मार्शल बोलावून महिला खासदारांना धक्काबुक्की करण्यात आली, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे

Updated : 12 Aug 2021 8:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top