Home > Politics > पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उध्दव ठाकरे एकाच मंचावर येणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उध्दव ठाकरे एकाच मंचावर येणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उध्दव ठाकरे एकाच मंचावर येणार
X

गेल्या काही दिवसांपासून केंद्र आणि राज्य सरकारमधील संघर्ष तीव्र झाला आहे. तर मोदी सरकारकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. त्यापार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ED ची कारवाई, याबरोबरच राज्याच्या जीएसटीचा वाटा आणि केंद्र सरकारने राज्य सरकारला इंधनावरचा कर कमी करण्यास सांगितल्याच्या मुद्द्यावरून राज्य आणि केंद्र सरकार संबंध ताणले गेले आहेत. त्यातच पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला होता. तर त्यापाठोपाठ मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही संताप व्यक्त केला होता. मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यामध्ये मोदी देहू येथील संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करणार आहेत. तसेच त्यानंतर पंतप्रधान मोदी हे मुंबईत राजभवन येथील जल भूषण या नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीचे आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेल्या दालनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाच मंचावर असणार आहेत. त्यामुळे दरवेळीप्रमाणे यावेळीही कोपरखळ्या मारल्या जाणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

तसेच राज्यसभा निवडणूकीतही भाजपने घोडेबाजार केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात येत आहे. त्यापार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे एकाच मंचावर आल्याने चर्चांना उधाण आले आहे.

पंतप्रधानांच्या दौऱ्यापुर्वी ‘पगडी’वाद रंगला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देहू येथे संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करणार आहेत. त्यामुळे या मंदिराच्या लोकार्पण प्रसंगी पंतप्रधान मोदी यांचे स्वागत वारकरी परंपरेप्रमाणे करण्यात येणार आहे. तर यावेळी देण्यात येणाऱ्या पगडीवर संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या ओळी लिहील्या आहेत. त्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यामुळे त्या ओळी बदलण्यात आल्या.

मोदींच्या पगडीवर काय होत्या ओळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट देण्यात येणाऱ्या पगडीवर ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी’ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या ओळी लिहीण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतर वाद निर्माण झाल्याने आता ‘विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ’ या ओळी लिहीण्यात आल्या आहेत.

Updated : 14 Jun 2022 11:29 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top