Home > Politics > आंबेडकरांचं मार्केट जोरात, ठाकरेंनंतर शिंदेगटातही दबदबा

आंबेडकरांचं मार्केट जोरात, ठाकरेंनंतर शिंदेगटातही दबदबा

आंबेडकरांचं मार्केट जोरात, ठाकरेंनंतर शिंदेगटातही दबदबा
X



मुंबई – एकही आमदार नाही, एकही खासदार नाही...तरीही वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांचीच महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चर्चा आहे.

काही दिवसांपूर्वी प्रबोधनकार डॉट कॉम या वेबसाईटच्या रिलॉँचिंगच्या निमित्तानं पहिल्यांदाच शिवसेना पक्षप्रमुख (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे) उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर एकत्र आले होते. त्याचवेळी हे दोघंही राजकीयदृष्ट्या एकत्र येण्याचा अंदाज वर्तविला जात होता. त्याच्या काही दिवसांनंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चाही सुरू झाली.

वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घेऊ नये, असं राष्ट्रवादीचं म्हणणं असल्याचा सूर वंचितच्या नेत्यांनी आवळला. त्यानंतर हळूहळू ही चर्चा कमी व्हायला सुरूवात झाली. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंसोबत जाण्यास वंचित बहुजन आघाडी तयार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांसमोरही सांगितलं. ठाकरे गटाच्या नेत्यांनीही वंचितसोबत युतीचे स्पष्ट संकेतही दिले होते. मात्र, त्यावर ठोस निर्णय न झाल्याने अजूनही संभ्रमाची स्थिती आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी वंचितसोबत युती झाली की नाही याबाबत अजूनही स्पष्टता नाही. मात्र, आगामी महापालिका निवडणूकीसाठी आंबेडकर-ठाकरे युती झाली असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलंय. याबाबत अधिकृत घोषणा कधी करायची ते उद्धव ठाकरेचं ठरवतील, असंही त्यांनी सांगितलं.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही बुधवारी (११ जानेवारी) रात्री अडीच तास वर्षा या शासकीय निवासस्थानी चर्चा झाली. त्यामुळं राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलंय. सध्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या पक्षात जोरदार इनकमिंग सुरू आहे. तर दुसरीकडे त्यांच्या पक्षाला पाठिंबा देणा-यांचीही संख्या वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच रिपाइं नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या पक्षाने शिंदे गटाला पाठिंबा दिलेला आहे. प्रा. कवाडे यांच्या पक्षाचा प्रभाव हा मर्यादित आहे. त्या तुलनेत प्रकाश आंबेडकरांना मानणारा एक मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. त्यामुळं वंचित सोबत आघाडी केल्यास आगामी सर्वच निवडणुकीत शिंदे गटाला मोठा फायदा होईल, असा मतप्रवाह शिंदे गटात सध्या सुरू आहे. मात्र, शिंदे गटाने भाजपची साथ सोडल्यास त्यांच्यासोबत राजकीय चर्चा होऊ शकेल, अशी स्पष्ट भुमिकाच प्रकाश आंबेडकरांनी घेतलीय.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणा-या मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षात स्पर्धा असते. त्यामुळं सरकार कुठल्याही पक्षाचं असलं तरी आंबेडकरी विचारधारेच्या मतदारांना आपल्या युती-आघाडीशी जोडून घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्नशील असतात.


वंचित बहुजन आघाडीचा सध्या महाराष्ट्रात एकही आमदार-खासदार नाही. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वंचितचा प्रभाव आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नांदेड, सांगली, सोलापूर, परभणी, गडचिरोली-चिमूर, बुलडाणा, हातकणंगले या सात मतदारसंघात वंचितचे उमेदवार दुस-या क्रमांकावर होते. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात तर एमआयएम आणि वंचितचे उमेदवार इम्तियाज जलील विजयी झाले. मात्र, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत वंचित आणि एमआयएम युती तुटली. तरी वंचितने आपला दबदबा कायम ठेवला आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला ३२ विधानसभा मतदारसंघात वंचितमुळे फटका बसला होता.

वंचित बहुजन आघाडीचे महत्त्व राजकीय धुरिणांना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे असो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो सगळ्यांनाच प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत असावेत, असं वाटतं.

Updated : 12 Jan 2023 3:04 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top