Top
Home > Politics > पुण्याचे खरे शिल्पकार कोण?

पुण्याचे खरे शिल्पकार कोण?

पुण्याचे खरे शिल्पकार कोण?
X

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थकांनी सध्या पुण्यात जोरदार पोस्टरबाजी सुरू केली आहे. या दोन्ही नेत्यांचा वाढदिवस एकाच दिवशी म्हणजे 22 जुलै रोजी असतो. पुण्याचे विकासपुरुष किंवा नव्या पुण्याचे शिल्पकार कोण, यावरुन दोन्हीकडचे समर्थक आपापल्या नेत्यांची नावे पुढे करत आहेत. यावरुन राजकारण तापले आहे. पण पुण्याचे खरे शिल्पकार कोण आहेत, याबाबत मत व्यक्त केले आहे श्रीमंत कोकाटे यांनी....त्यांनी काय म्हटले आहे ते पाहूया....

"पुण्याचे शिल्पकार कोण, या श्रेयवादावरून सध्या पुण्यात मोठी पोस्टरबाजी सुरु आहे. देवेंद्र फडणवीस यांचे कार्यकर्ते म्हणतात "फडणवीस पुण्याचे शिल्पकार" तर अजित पवार यांचे कार्यकर्ते म्हणतात "अजित पवार पुण्याचे शिल्पकार!"पुणे हे शहाजीराजांच्या जहागिरीचे गाव, पण या गावावरती आदिलशहाचा सरदार मुरार जगदेव यांने गाढवाचा नांगर फिरवला होता व इथून पुढे मानवी वस्ती होणार नाही अशी दहशत निर्माण केली होती. ती दहशत मोडून टाकण्याचं महान कार्य राजमाता जिजाऊनी केले. राजमाता जिजाऊ बाल शिवबाला घेऊन १६४६ सालाला पुण्यात आल्या. ज्या पुण्यात मुरार जगदेवाने गाढवाचा नांगर फिरवला होता,त्याच पुण्यात जिजाऊंनी सोन्याचा नांगर फिरवला.त्यांनी शेतकऱ्यांना अभय दिले. गोरगरीबांना आश्रय दिला. गुंडांचा बंदोबस्त केला. हिंस्त्र श्वापदांचा बंदोबस्त केला. त्यामुळे हळूहळू मानवी वस्ती होऊ लागली. राजमाता जिजाऊनी पुण्याचा कायापालट केला. पुण्याचा जीर्णोद्धार केला. पुण्याची जडणघडण केली. त्यामुळे राजमाता जिजाऊ आणि शिवबा हेच पुण्याचे शिल्पकार आहेत

महात्मा फुले-सावित्रीबाई फुले यांनी आधुनिक काळात पुण्यामध्ये क्रांतिकारक कार्य केले.आपल्या देशातील पहिली मुलींची आणि मुलांची मोफत आणि सर्वांसाठी शाळा महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी सुरू केली. आपल्या देशात शिक्षणाचा पाया महात्मा फुले-सावित्रीबाई फुले यांनी घातला. त्यांनी सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून सनातनी व्यवस्थेला पायबंद घातला.महात्मा फुले यांची प्रेरणा घेऊन केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर यांनी पुण्यात ब्राह्मणेतर चळवळ सुरू केली. पुण्यामध्ये सर्वांना पाणी आणि सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे, तसेच पुण्यात महात्मा फुले यांचा पुतळा उभारला पाहिजे, यासाठी जवळकरांनी पुण्यात आवाज उठविला.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या सहकार्याने पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटी, श्री. शिवाजी मराठा सोसायटी, अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद, ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी इत्यादी संस्थांची स्थापना झाली.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी पुण्यात अस्पृश्यता निर्मूलनाचे महान कार्य केले. शंकरराव मोरे, भाऊसाहेब शिरोळे, बाबुराव सणस, अण्णासाहेब मगर ,प्रा. रामकृष्ण मोरे यांनी पुणे, पिंपरी चिंचवडचा कायापालट करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.

पुण्याचे शिल्पकार राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, शंकरराव मोरे, भाऊसाहेब शिरोळे, बाबुराव सणस इत्यादी मान्यवर आहेत. फडणवीस-पवारांनी पुण्याचे शिल्पकार होण्याचे श्रेय घेणे हा उतावळेपणा ठरेल !

डॉ.श्रीमंत कोकाटे

Updated : 2021-07-21T14:36:57+05:30
Next Story
Share it
Top