Home > Politics > संसदेच्या अधिवेशनाची वादळी सुरुवात, विरोधक पहिल्याच दिवशी आक्रमक, मोदींना भाषण थांबावं लागलं...

संसदेच्या अधिवेशनाची वादळी सुरुवात, विरोधक पहिल्याच दिवशी आक्रमक, मोदींना भाषण थांबावं लागलं...

संसदेच्या अधिवेशनाची वादळी सुरुवात, विरोधक पहिल्याच दिवशी आक्रमक, मोदींना भाषण थांबावं लागलं...
X

Parliament Monsoon Session News Update: आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बोलायला सुरुवात केली. आज ते नवीन मंत्र्यांचा परिचय करुन देत असताना सभागृहात विरोधकांनी मोठा गोंधळ घातला.

कॉंग्रेस, टीएमसी, बसपा आणि अकाली दलाच्या नेत्यांनी महागाई, शेतकरी आंदोलन आणि इतर मुद्द्यावर सभागृहात घोषणा दिल्या. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन मंत्र्यांचा परिचय देखील देऊ शकले नाही. त्यामुळं सभागृहाच कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं.

यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाराजी व्यक्त केली. "मला वाटलं होतं की, इतक्या महिला, दलित, आदिवासी मंत्री झाल्याने संसदेत उत्साह असेल. यावेळी कृषी, ग्रामीण, ओबीसी समाजातील सहकाऱ्यांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आलं आहे. पण काही लोक महिला, ओबीसी आणि शेतकऱ्यांच्या मुलांना मंत्री होण्याची संधी दिल्याने आनंदी नाहीत. यामुळे त्यांची ओळख करुन देण्याची परवानगी ते देत नाही आहेत," अशा शब्दात मोदी यांनी विरोधकांवर तोंडसुख घेतलं.

दरम्यान आज सकाळी स्वत: छत्री घेऊन मोदी संसदेत पोहोचले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मात्र, हा संवाद मोदी यांच्या 'मन की बात' ठरला. कारण या संवादात एकाही पत्रकाराना प्रश्न विचारण्याची संधी देण्यात आली नव्हती. Parliament Monsoon Session

पंतप्रधान म्हणाले की, या साथीने संपूर्ण जगाला वेढले आहे, त्यामुळे संसदेतही या साथीच्या संदर्भात अर्थपूर्ण चर्चा व्हायला हवी असं आम्हाला वाटतं. सर्व व्यावहारिक सूचना सर्व खासदारांनी करायला हव्यात.

मी आशा करतो की तुम्हा सर्वांना लसीचा किमान एक डोस तरी मिळाला असेल. लस दंडांवर (बाहू) दिली जाते त्यामुळे लस घेतल्यावर तुम्ही बाहुबली बनता. कोरोनाविरूद्धच्या लढाईमध्ये आत्तापर्यंत ४० कोटीहून अधिक लोक बाहुबली बनले आहेत.

पंतप्रधान म्हणतात की, संसदेचं पावसाळी अधिवेशन अर्थपूर्ण चर्चेसाठी समर्पित असले पाहिजे. कारण लोकांना बर्‍याच विषयांवर उत्तरं हवी आहेत. आणि सरकार यासाठी पूर्णपणे तयार आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पत्रकारांशी बोलताना पंतप्रधानांनी विरोधी पक्षाने कठीण प्रश्न विचारावे. परंतु शांत वातावरणात सरकारला उत्तर देण्याची संधी सुद्धा द्यावी असं आवाहन देखील यावेळी मोदी यांनी यावेळी केलं.

Updated : 19 July 2021 7:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top