Home > Politics > शिंदे- फडणवीस मंत्रीमंडळातही आयारामांची गर्दी

शिंदे- फडणवीस मंत्रीमंडळातही आयारामांची गर्दी

शिंदे- फडणवीस मंत्रीमंडळातही आयारामांची गर्दी
X

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केल्यानंतर ४० दिवसांनंतर राज्यमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला आहे. राजभवनावरील शपथविधी सोहळ्याच्या पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. मात्र या पहिल्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्तारामधे शिंदे गटासह भाजपमधील मंत्र्याची यादी पाहता आयारामांना मोठी संधी मिळाल्याचे दिसत आहे.

आज राजभवानमध्ये पार पडलेल्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये एकूण १८ मंत्र्यांनी शपथ घेतली. शिंदे गटाकडून तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील यांनी शपथ घेतली. तर भाजपाकडून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित, मंगलप्रभात लोढा यांना नव्या मंत्रीमंडळात संधी देण्यात आली आहे.

तानाजी सावंत पुण्यातील शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योगपती तानाजी सावंत 2015 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. 2016 साली शिवसेना उपनेते म्हणून नियुक्त करण्यात आले.2016 साली सावंत विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आले होते. 2017 साली उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख नियुक्त झाले. तानाजी सावंत हे 2014 सालच्या सेना भाजप सरकारमध्ये जलसंधारण मंत्री झाले होते.2019 च्या निवडणुकीत उस्मानाबाद येथील भूम परांडा मतदार संघातून विधानसभेवर निवडून आले.महाविकास आघाडीत मंत्रिपद न मिळाल्याने तानाजी सावंत हे नाराज होते. शिंदेच्या बंडखोरीनंतर तानाजी सावंत शिदे गटात सहभागी झाले. मंत्रीमंडळ विस्तारात ते आता कॅबिनेट मंत्री झाले आहेत.

उदय सामंत यांनी रत्नागिरी मतदारसंघात 2004 ते 2019 या काळात पकड बसवली. जिल्ह्यात तळागाळात कार्यकर्त्यांची फौज तयार केली.रत्नागिरीत त्यांचा सध्या एकछत्री अंमल आहे. शिवसेना वाढवण्यात त्यांचा मोठा हात असला तरी त्यांची राजकीय कारकिर्द राष्ट्रवादी पक्षातून झाली होती. भाजपच्या उमेदवाराचा पराभव करुन त्यांनी राजकारणाचा श्रीगणेशा केला. त्याच भाजपसोबत सत्तेत असताना मंत्रीपद भुषविले. सेना-भाजपचा मतदारसंघ म्हणून रत्नागिरीची ओळख आहे. 2004 साली राष्ट्रवादी काँग्रेसने युवा नेतृत्व असलेल्या उदय सामंत यांच्यावर विश्वास टाकला आणि त्यांनी या संधीचे सोने केले. आमदार म्हणून ते विजयी झाले. दहा वर्षानंतर त्यांनी राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र केले आणि शिवसेनेचा भगवा हाती धरला. त्यानंतर ही त्यांची राजकीय घौडदौड कायम राहिली. शिवसेनेत जाण्याचा त्यांचा निर्णय योग्य ठरला. युतीच्या काळात त्यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली. पुढे शिवसेना आणि भाजपमध्ये दुरावा आल्यानंतर ही महाविकास आघाडीत मंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री म्हणून कार्यरत होते. आता त्यांनी योग्य टायमिंग साधत शिंदे गटाचा हात धरला आणि त्यांच्या गळ्यात कॅबिनेट मंत्रीपदाची माळ आपसूकच पडली.

2001 साली अब्दुल सत्तार हे विधानपरिषदेवर निवडून गेले. 2004 साली अब्दुल सत्तार हे अतिशय कमी फरकाने विधानसभा निवडणूक हरले. 2009 साली ते पहिल्यांदा सिल्लोडमधून विधानसभा निवडणूक जिंकून आले. 2014 साली (विधानसभा निवडणूकांआधी) कॉंग्रेसच्या मंत्रीमंडळात ते काही महीने कॅबिनेट मंत्री झाले. त्यानंतर विधीमंडळात विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडताना ते चर्चेत राहीले.2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी कॉंग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी महसूल, ग्रामविकास या खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम केलं.उद्धव ठाकरेंच्या विरोधात एकनाथ शिंदे यांनी 50 आमदारांसह बंड केलं. त्यात ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहत मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री झाले आहेत.

काँग्रेसी विचारसरणीचा पुरस्कार करत काँग्रेसमधून राजकारणाला सुरुवात करणारे दिपक केसरकरांनी सावंतवाडी पालिकेतून राजकीय कारकीर्द सुरु केली. काँग्रेसमध्ये असताना राष्ट्रवादीचे नेते प्रवीण भोसलेंशी जवळीक होती. 2009 ची विधानसभा निवडणूक टर्निंग पॉईंट ठरत प्रवीण भोसलेंना शह देत राष्ट्रवादीकडून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळवली. केसरकरांना आमदार म्हणून निवडून आणण्यात नारायण राणेंची महत्वाची भूमिका

होती. 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला. .2014च्या विधानसभेत शिवसेनेकडून आमदार म्हणून निवडून आले. 2014 च्या फडणवीस सरकारमध्ये केसरकरांवर गृहराज्यमंत्री पदासह अर्थ व वित्त विभागाची जबाबदारी होती. महाविकास आघाडी स्थापन झाल्याने शिवसेनेवर नाराज होऊन शिंदे गटात सामील झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये केसरकरांची कॅबिनेटपदी वर्णी लागली आहे.

डॉ. विजय कुमार गावित राजकीय वारसा नसला तरी त्यांच्या वडिलांना आदिवासी समाजासाठीच योगदान असल्याने त्यांना जनता दलाकडून तिकीट मिळाले. त्यानंतर खऱ्या अर्थाने गावित कुटुंबात राजकीय वारसा सुरु झाला. त्यानंतर हळहळू डॉ. गावित हे देखील राजकारणात रमू लागले. वडिलांच्या सोबत आंदोलने, निदर्शने आदी ठिकाणी सहभागी घेतला. त्यांनतर 1995 नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा अपक्ष म्हणून विजय मिळवला. पहिल्यांदा युती सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर डॉ. गावित यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2000 ते 2014 सलग नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून विजयी होऊन कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. तर 2014 राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश करीत नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून विजय. संपादन केला. पुन्हा 2019 च्या नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून भाजपा कडून विजयी झाल्यानंतर यंदाच्या शिंदे सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना आदिवासी विकास विभागात मोठ्या प्रमाणत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहेत.

राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजकीय प्रवास शिवसेना, काँग्रेस आणि भाजप असा आहे. महाविकास आघाडीचा काळ सोडला तर सर्वच पक्षांच्या सरकारमध्ये ते मंत्री होते. पूर्वी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात विखे-पाटील काँग्रेसमध्ये आणि विरोधी पक्षनेते होते.जून २०१९ मध्ये ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेस सरकारच्या काळात त्यांनी गृहनिर्माण, परिवहन, शिक्षण ही खाती सांभाळली आहेत. युतीच्या सरकारमध्ये ते कृषीमंत्रीही होते.२०२२ मधे शिंदे फडणवीस सरकारमधेही त्यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे.

Updated : 28 Aug 2022 2:25 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top