एक हजार खोके एकदमच ओक्के, आदित्य ठाकरेंवर शिंदे गटाचा हल्ला
X
शिंदे गटावर सातत्याने आरोप कऱणाऱ्या माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आता तब्बल १ हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मालाड परिसरातील मढ येथे अनधिकृत स्टुडिओच्या घोटाळ्यात आदित्य ठाकरे यांचा हात असल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर आता शिंदे गटानेही एक हजार खोके एकदमच ओक्के अशी घोषणा देत आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
शिंदे गटातील नेत्या आणि माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी यासंदर्भात एक ट्विट करत हा आरोप केला आहे. आदित्य ठाकरे यांचा १ हजार कोटींचा घोटाळा असा थेट आरोप या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. ज्यावेळी कोरोना काळात सामान्य मुंबईकर जगण्यासाठी संघर्ष करत होते तेव्हा हा १ हजार कोटींचा घोटाळा सुरू होता, असा आरोप त्यांनी केला आहे.
आता नवीन घोषणा... एक हजार खोके.. एकदमच ओके!! pic.twitter.com/s7B7xciFKo
— sheetal mhatre (@sheetalmhatre1) September 11, 2022
मुंबईतील मालाड परिसरात मढ येथे अनधिकृतपणे स्टुडिओ बांधण्यात आल्याचा आरोप झाला आहे. या घोटाळ्यात आदित्य ठाकरे आणि माजी मंत्री अस्लम शेख यांचा सहभाग असल्याचा आरोप भाजपने याआधीच केला आहे. आता शिंदे गटाने थेट आदित्य ठाकरे यांच्यावर १ हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.