Home > Politics > एक व्यक्ति एक पदाच धोरणाला काँग्रेसमध्ये तिलांजली

एक व्यक्ति एक पदाच धोरणाला काँग्रेसमध्ये तिलांजली

एक व्यक्ति एक पदाच धोरणाला काँग्रेसमध्ये तिलांजली
X

कॉंग्रेसमध्ये वरीष्ठ पातळीवरुन एखादा निर्णय घेतला म्हणजे त्याची स्थानिक पातळीवर अंमलबजावणी होईलच, याची शाश्वती नसते. एक व्यक्ती- एक पद असे धोरण काँग्रेस पक्षाच्या तीन दिवसीय नवसंकल्प चिंतन शिबीर लागू केले असताना कॉंग्रेसचे विधानपरिषद आमदार डॉ. वजाहत मिर्झा हे पुर्वीच अनेक पदे भूषवित असतांना पुन्हा महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक अध्यक्ष पद देण्यात आल्याने पक्षाने स्वतःच्या धोरणाला तिलांजली दिल्याची टिका काँग्रेसच्याच राज्यस्तरावरील नेत्यांकडून होत असून मुंबईच्या बैठकीत काँग्रेस राज्य प्रभारींनी या नियुक्तीबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

मोठा गाजावाजा करून काँग्रेस पक्षाचे तीन दिवसीय नवसंकल्प चिंतन शिबीर राजस्थान येथील उदयपूर येथे झाले. १२ ते १५ मे पर्यंत झालेल्या या शिबिरात काँग्रेसच्या देशभरातील वरिष्ठ नेत्यांसह युवक आणी महिला नेत्यांचा समावेश होता. चार राज्यातल्या पराभवानंतर काँग्रेसला ऊर्जा देणारे हे चिंतन ठरेल अशी आशा होती. काँग्रेसला आलेली मरगळ दूर करण्याचा दृष्टीने अत्यंत महत्वाचे ठराव या चिंतन शिबिरात मंजूर करण्यात आले. यापुढे एक व्यक्ती- एक पद असे धोरण राहील अशी घोषणा करण्यात आली.

या धोरणानुसार अनेकांनी आपल्याकडील पदाचे राजीनामे दिले. परंतू काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक विभागाच्या अध्यक्षपदी यवतमाळ जिल्ह्यातील डॉ. वजाहत मिर्झा यांची नियुक्ती करण्यात आली. आश्चर्याची बाब म्हणजे वजाहत मिर्झा विधान परिषदेचे आमदार, यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेल्या महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष व यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष या चार पदावर आहेत. राज्याच्या काही समित्यांवर सुद्धा ते आहेत.

२२ मे ला वजाहत मिर्झा यांची नियुक्ती पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी पत्राद्वारे घोषित करताच काँग्रेस कार्यकर्ते व नेते यांच्यात अस्वस्थता पसरली व काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना डॉ. मिर्झा यांच्याकडे सध्या असलेल्या पदांची माहिती न देता त्यांची मान्यता या नियुक्तीला घेण्यात आली. यासह विविध प्रकारच्या चर्चा या नियुक्तीच्या बाबतीत होऊ लागल्या. महाराष्ट्रातील अल्पसंख्यांकांशी संबंधीत सर्व पदे मिर्झा यांना देण्याचा पक्षाचा निर्णय झाला अशी नाराजी राज्यातील मुस्लिम नेते व कार्यकर्ते सर्वत्र व्यक्त करीत होते. याचे तीव्र पडसाद २३ मे ला मुंबई येथे झालेल्या प्रदेश काँग्रेस समितीच्या बैठकीत पडले.

मुंबई येथील टिळक भवन मध्ये पार पडलेल्या प्रदेश काँग्रेस कमिटीच्या बैठकीत राज्याचे प्रभारी एच. के. पाटील म्हणाले की, आमदार वजाहत मिर्झा यांची झालेली ही नियुक्ती अयोग्य असून त्यांनी राजीनामा द्यावा किंवा मला महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी या नात्याने या नियुक्तीला रद्द करण्याबाबत प्रस्ताव पक्षश्रेष्ठीकडे पाठवणार असल्याचे सांगितले. नाना पटोले यांनीही यावर तातडीने कार्यवाही करत "जिल्हाध्यक्ष पदावरून मिर्झा यांना मुक्त करण्यात आले आहे. "एक व्यक्ती-एक पद"या धोरणानुसार राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची माहिती मागवण्यात आली आहे. याबाबत मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याची भूमिका पक्षश्रेष्ठींनी घेतली असल्याचे पटोले यांनी सांगितले.

Updated : 28 May 2022 1:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top