News Update
Home > Politics > "UPA आता अस्तित्वात नाही" शरद पवारांच्या भेटीनंतर ममता बॅनर्जी यांचे मोठे विधान

"UPA आता अस्तित्वात नाही" शरद पवारांच्या भेटीनंतर ममता बॅनर्जी यांचे मोठे विधान

UPA आता अस्तित्वात नाही शरद पवारांच्या भेटीनंतर ममता बॅनर्जी यांचे मोठे विधान
X

प.बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शरद पवार यांच्या भेटीनंतर एक मोठे वक्तव्य केले आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणजेच UPA आता अस्तित्वात नाही, असे वक्तव्य ममता यांनी केले आहे. ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी या प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. भाजपला पर्याय देण्यासाठी आघाडीची गरज असल्याचे सांगत शरद पवार यांनी ही भेट त्यासंदर्भातच होती असे स्पष्ट केले.

देशात वाढत असलेल्या फॅसिझमविरोधात एकत्र येण्याची गरज आहे, कुणीही या शक्तींविरुद्ध एकटे लढू शकत नाही, त्यामुळे एक सशक्त पर्याय द्यावा लागेल, त्यासाठी जे सशक्त आहेत त्यांनी एकत्र येण्याची गरज ममता बॅनर्जी यांनी यावेळी व्यक्त केली. यानंतर पत्रकारांनी शरद पवार UPAचे नेतृत्व करणार का, असा सवाल विचारला. त्यावर "UPA काय आहे, आता UPAच नाही त्यामुळे आम्ही एकत्र बसून ठरवू" असे उत्तर ममता बॅनर्जी यांनी दिले आहे.

म्हणजे भाजपविरोधातला सशक्त पर्याय काँग्रेस शिवाय असेल का असा प्रश्न विचारल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, "शरद पवार यांनी सांगितल्याप्रमाणे ज्यांना लढायचे आहे त्यांनी सशक्त पर्याय दिला पाहिजे. जर कुणाला लढायचे नसेल तर काय करणार? प्रत्येकाने लढले पाहिजे असे आम्हाला वाटते."

दरम्यान शरद पवार यांनी सशक्त नेतृत्वाची गरज व्यक्त केली. समविचारी पक्षांनी राष्ट्रीय पातळीवर एकत्र येऊन लढले पाहिजे, तसेच सामूहित नेतृत्व निर्माण केले पाहिजे, असे ममता बॅनर्जी यांना म्हणायचे आहे, असे सांगितले. तसेच आमचा विचार आजसाठी नाही तर येणाऱ्या निवडणुकांसाठी आहे, असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले. काँग्रेसशिवाय आघाडी असेल या प्रश्नावर शरद पवारांनी ज्यांचा भाजपला विरोध आहे, त्यांनी आमच्यासोबत यावे, कुणालाही बाहेर ठेवण्याचा प्रश्नच नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. आता या राजकीय घडामोडीवर काँग्रेसतर्फे काय भूमिका व्यक्त केली जाते, ते पाहणे महत्त्वाचे आहे.

Updated : 1 Dec 2021 12:57 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top