Home > Politics > शरद यादव यांना जोडीला घेऊन नितीश कुमार भाजपला शह देऊ इच्छितात का?

शरद यादव यांना जोडीला घेऊन नितीश कुमार भाजपला शह देऊ इच्छितात का?

नितिश कुमार यांना जुन्या पक्षाच्या नेत्यांची का झाली आठवण? नितिश कुमार आणि शरद यादव यांच्यातील वाद कधी संपणार? वाचा बिहारच्या राजकारणातील मोठी घडामोड

शरद यादव यांना जोडीला घेऊन नितीश कुमार भाजपला शह देऊ इच्छितात का?
X

नितिश कुमार यांचे एकेकाळचे सहकारी असलेले शरद यादव पुन्हा एकदा जेडीयू च्या वाटेवर असल्याचं कळतंय. जेडीयूपासून वेगळं झाल्यानंतर शरद यादव यांनी लोकतांत्रिक जनता दलाची स्थापन केली होती. मात्र, त्यांच्या पक्षाला निवडणुकीत अपयशाला सामोरं जावं लागलं होतं. त्यांनी स्वतः राजदच्या वतीने 2019 ची लोकसभा निवडणूक सुद्धा लढवली होती. मात्र, त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.

यासगळ्या परिस्थितीनंतर, आता पुन्हा एकदा शरद यादव जेडीयूमध्ये परत येण्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, प्रश्न असा आहे की, ज्या परिस्थितीत शरद यांनी जेडीयू ला राम राम ठोकला. त्या परिस्थितीनंतर ते जेडीयू मध्ये परतील का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो.

मात्र, सध्या शरद यादव ज्या राजकीय गोंधळात आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना मजबूत राजकीय पाठबळाची गरज आहे. दरम्यान, जेडीयूच्या गोटात सुरू असलेल्या चर्चेनुसार, ते पुन्हा पक्षात परत येण्याची शक्यता आहे. तसंच शरद यादव यांना जेडीयू हा सर्वोत्तम उत्तम पर्याय असू शकतो. असं अनेकांचं म्हणणं आहे. पण या सर्व चर्चांना बळ मिळालं जेव्हा, जेडीयू चे संसदीय बोर्डाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी दिल्लीत यादव यांची भेट घेतली.

उपेंद्र कुशवाहा आणि शरद यादव यांची ही सदिच्छा भेट होती. मात्र, असं ही समजतंय की, बिहारमधील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर दोघांमध्ये दीर्घ चर्चा झाली. मात्र, या सगळ्या परिस्थितीत या दोन नेत्यांची बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

दोघांमधील ही चर्चा प्रामुख्याने शरद यादव यांच्या जेडीयूमध्ये परतण्याच्या मुद्यावर झाल्याची माहिती येत आहे. दरम्यान, जेडीयूच्या सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार शरद यादव यांनी उपेंद्र कुशवाह यांच्याकडे जेडीयूमध्ये पुन्हा सामील व्हावे की नाही? यावर विचार करण्यासाठी काही वेळ मागितला आहे.

दरम्यान, शरद यादव बऱ्याच दिवसांपासून आजारी आहेत. मात्र, त्याच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. आणि आता ते सक्रिय राजकारणात परतण्याची तयारी करत आहे. शरद यादव यांचा राजकीय अनुभव खूप मोठा आहे. ते JDU चे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय मंत्री, तसेच खासदार देखील राहिले आहेत. तसंच यादव वर्गामध्ये त्यांची चांगली पकड देखील आहे.

2017 मध्ये नितीशकुमार यांनी महागठबंधन सोडून एनडीएमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून शरद यादव नितिश कुमार यांच्यामध्ये वाद आहे. त्यानंतर त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. या दरम्यान त्यांचे राज्यसभा सदस्यत्वही संपुष्टात आले होते.

मात्र, जेव्हा 2020 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत जेडीयू तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेल्याने जेडीयूला शरद यादव यांची पुन्हा आठवण झाली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत जेडीयूला फक्त 43 जागा मिळाल्या होत्या. मात्र, तरी सुद्धा नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले.

पक्षाची ही परिस्थिती पाहता नितीशकुमार सतत पक्ष आणि संघटना मजबूत करण्यात मग्न आहेत. याच्या अंतर्गत, ज्यांनी पक्ष सोडला होता. त्यांना पुन्हा पक्षात घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. काही जाणकारांच्या मते भविष्यात भाजपला शह देण्यासाठी नितिश कुमार रणनीति आखत असल्याचं बोललं जात आहे.

राज्यात राष्ट्रीय जनता दल पक्षाच्या (तेजस्वी यादव) जागा वाढल्या असल्या तरी भाजपच्या जागा देखील वाढल्या आहेत. भाजपच्या वाढलेल्या जागा नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड साठी डोकेदुखी ठरल्या आहेत. भाजपची झालेली वाढ नितीश कुमार यांच्यासाठी मोठा फटका समजला जात आहे. त्यामुळं नितीश कुमार भविष्यातील तयारी म्हणून शरद यादव यांना पक्षात घेऊन पुन्हा एकदा पक्षाची मोठ बांधून पक्षाला गतवैभव मिळून देण्याच्या प्रयत्नात आहेत.

Updated : 21 Sep 2021 8:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top