Home > Politics > तर पोलिसांच्या गोळ्या खाणारा पाहिला व्यक्ती मी असेन - जितेंद्र आव्हाड

तर पोलिसांच्या गोळ्या खाणारा पाहिला व्यक्ती मी असेन - जितेंद्र आव्हाड

एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या. त्यामुळे जनरल लोकलच्या फेऱ्या कमी झाल्या. त्यावरून संताप व्यक्त करत नागरिकांनी शुक्रवारी रेल रोको केला होता. त्यासंदर्भात नागरिकांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली असता जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वे प्रशासनाला रेल रोको करण्याचा इशारा दिला आहे.

तर पोलिसांच्या गोळ्या खाणारा पाहिला व्यक्ती मी असेन - जितेंद्र आव्हाड
X

मुंबईत एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात आल्याने साध्या लोकलच्या फेऱ्या कमी झाल्या. त्यामुळे त्याचा फटका प्रवासी नागरिकांना बसला. त्यामुळे नागरिकांनी संतप्त होत 19 ऑगस्ट रोजी रेल रोको केला होता. तर यासंदर्भात आपल्या समस्या आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यापुढे मांडल्या. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वे प्रशासनाला रेल रोको करण्याचा इशारा दिला आहे.

एसी लोकलचे गगनाला भिडलेल्या दरामुळे प्रवासी नाराज होते. त्यातच 19 ऑगस्टपासून एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला. त्यामुळे नेहमीची साधी लोकल एसी झाली. त्यामुळे शनिवारी नागरिकांनी संताप व्यक्त करीत रेल रोको केला होता. याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे नागरिकांनी आपले गाऱ्हाणे मांडल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी इशारा दिला. यावेळी आव्हाड म्हणाले की, तिसऱ्या आणि चौथ्या प्लॅटफॉर्म्सची निर्मिती कळवा, मुंब्रा स्थानकात झाली. लोकांना वाटलं होतं की जलद लोकलना स्थानकांमध्ये थांबा मिळेल. परंतू लोकल थांबणं सोडा, आहेत त्या कमी करून एसी लोकल्सची संख्या वाढवण्यात आली. एसी लोकल्सच्या बाबतीत आक्षेप नाही पण त्यांच्या तिकीट दरांबाबत आक्षेप आहे. कळवा ते सीएसएमटी हा एका दिवसाचा परतीचा प्रवास एसी लोकलने २०० रूपयांना पडतो तर जनरल लोकलचा महिन्याचा पास २१५ रूपयांना मिळतो. महागाईच्या जमान्यात हे परवडतं का? न परवडणाऱ्या गोष्टींचा भार प्रवाशांवर ठेऊन त्यांच्या खिशाला कात्री कशाला लावता? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, प्रवाशांनी एसी लोकलची मागणी केल्याचा रेल्वेचा दावा खोटा आहे. कारण अनेक स्थानकांमध्ये पाहिलं तर एसी लोकलमधून अवघे 10 ते 20 लोक प्रवास करतात. बाकी शेकडो लोक प्लॅटफॉर्मवर साध्या लोकलची वाट पाहतात. त्यामुळे जे अधिकारी एसीच्या केबिनमध्ये बसून निर्णय घेतात. ते मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठे आहेत का? असा सवाल यावेळी केला. तसेच रेल्वे हे संस्थान आहे. तर अधिकारी हे लहान लहान संस्थानिक आहेत. त्यामुळे त्यांना गरीबांबद्दल काही फरक पडत नाही. त्यामुळेच कळवा आणि मुंब्रा येथून लांब पल्ल्याच्या गाड्या जातात. त्यामुळे आम्हाला अख्खा देश थांबवता येतो. मी स्वतः हे केलेलं आहे. त्यामुळे जर एक्सप्रेस आणि मेल समोर रेल रोको केला तर गोळ्या माराल ना? असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी इशारा दिला. आव्हाड म्हणाले, गेल्या तीन महिन्यात 180 लोक खांबावर आदळून मेले. यावेळी गोळीबाराने मरतील. मात्र पोलिसांनी गोळ्या झाडल्या. तर त्यात सर्वात आधी गोळीला सामोरं जाणारा मी असेल, असंही आव्हाड म्हणाले.

रेल्वेचं म्हणणं काय ?

रेल्वेगाडी थांबवून निदर्शन करणे चुकीचे आणि बेकायदेशीर आहे. कळवा कार शेडच्या बाहेर जवळपास २० मिनिट्स गाडी थांबवली. शहर पोलिस यावर उचित कारवाई करतील. यामुळे रेल्वेचे तर नुकसान होतेच मात्र इतर प्रवाश्यांना देखील याचा त्रास होतो, अशी प्रतिक्रीया शुक्रवारी झालेल्या आंदोलनाबाबत मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली होती.

या शिवाय फेब्रुवारीमध्ये पायाभुत सुविधांत वाढ झाल्यानंतर उपनगरीय ट्रेनच्या फेऱ्यांत ३४ सेवा वाढवण्यात आल्या. वातानुकूलित सेवांतील दैनंदीन सरासरी प्रवासी संख्या फेब्रुवारी २०२२ मधील ५९३९ वरून ऑगस्ट २०२२ मध्ये ३९३२० इतकी म्हणजेच ६ पटीने जास्त वाढली आहे. वातानुकूलित सेवांतून वाढलेली प्रवासी संख्या तसेच प्रवाशांकडून वातानुकूलित सेवा वाढविण्याबाबत सातत्याने होणारी मागणी व मुंबईतील वातावरण यांचा विचार करून १० वातानुकूलित सेवा दि. १९ ऑगस्ट २०२२ पासून म्हणजेच आज पासून वाढविण्यात येणार आहेत. यामुळे प्रवाशांना निश्चितच सुविधा होणार आहे, असं स्पष्टीकरण त्यांनी एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्यासंदर्भात दिलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

मध्य रेल्वेच्या ठाणे आणि डोंबिवली या दोन स्थानकांमध्ये कळवा, मुंब्रा, दिवा आणि कोपर अशी चार स्थानकं येतात. आता मध्य रेल्वेच्या डोंबीवली स्थानकातून सीएसएमटी साठी लोकल सुटते. ती सकाळी गर्दीच्या वेळेस कोपर आणि दिवा स्थानकातच गर्दीने खच्चून भरते. उरली सुरली जागा मुंब्रा स्थानकातील प्रवासी व्यापतात. त्यामुळे कळवा स्थानकातील प्रवाशांना लोकलमध्ये चढण्यासच मिळत नाही, हीच परिस्थिती डोंबिवली पुढील स्थानकात टर्मिनेट होणाऱ्या लोकल्स संदर्भात आहे. तेव्हा दिवा स्थानकातील प्रवाशांना हा त्रास सहव करावा लागतो. लोकल मध्ये चढायलाच मिळत नसल्याने कळव्याचे प्रवासी कळवा कारशेडमधून सुटणाऱ्या ठाणे - सीएसएमीटी लोकल मध्ये ट्रॅकमध्ये थांबताच चढतात आणि प्रवास करतात. हा जीवघेणा, बेकायदेशीर प्रवास त्यांना नाईलाजाने करावा लागतो. शुक्रवारी अशाच प्रकारे प्रवासी ठाणे स्थानकासाठी कारशेड मधून रवाना होणाऱ्या लोकलमधून प्रवास करण्यासाठी गेले पण तिथे एसी लोकल लागली असल्याने प्रवाशांचा ताबा सुटला आणि त्यांनी रेल रोको केला. त्यावेळी स्थानिक पोलिसांनी लाठीचार्ज करून ही गर्दी पांगवली होती. शिवाय एसी लोकलच्या भरमसाठ तिकीट दरांमुळे सर्वसामान्यांचा एसी लोकल ला विरोध आहे. याचाच आढावा घेणारा स्पेशल रिपोर्ट मॅक्स महाराष्ट्रने शुक्रवारीच केला होता.

Updated : 22 Aug 2022 3:35 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top