Home > Politics > खासदार सुजय विखेंच्या टीकेला अमोल मिटकरी यांचे प्रत्युत्तर

खासदार सुजय विखेंच्या टीकेला अमोल मिटकरी यांचे प्रत्युत्तर

खासदार सुजय विखेंच्या टीकेला अमोल मिटकरी यांचे प्रत्युत्तर
X

राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडी संघर्ष रंगला आहे. मात्र सुजय विखे यांनी थेट शिवसेनेचे कौतूक केले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. त्यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सुजय विखे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

राज्यात भाजप विरुध्द शिवसेना संघर्ष टोकाला गेला आहे. मात्र भाजपचे खासदार सुजय विखे यांनी माझ्या विजयात शिवसेनेचा 50 टक्के वाटा असल्याचे मत व्यक्त केले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. तर त्यानंतर सुजय विखे यांनी राष्ट्रवादीवरही टीका केली होती. त्याला अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले.

अमोल मिटकरी म्हणाले की, सुजय विखे यांना कधीपासून शिवसेनेची काळजी वाटायला लागली. त्यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं. स्वतःचा लोकसभा मतदारसंघ सांभाळावा. तसेच महाविकास आघाडीच्या कार्यात नाक खुपसू नये. आमचं सर्व व्यवस्थित आहे. याबरोबरच विधानपरिषद निवडणूकीत तुम्हाला त्याची किंमत पहायला मिळेल. कारण ज्याप्रकारे घोडेबाजार करून तुम्ही तुमचा उमेदवार निवडून आणला आहे. त्यामुळे पैशापुढेच आम्ही हरलो. पण तुमचं सुडनितीचं राजकारण आणि देवेंद्र फडणवीस यांची कपटनिती जिंकलेली आहे. तुमचा विजय झाला नाही. त्यामुळे सुजय विखे यांनी आपला मतदारसंघ सांभाळावा. महाविकास आघाडीत नाक खुपसायचं काम करू नये, अशी प्रतिक्रीया व्यक्त करण्यात आली आहे.

सुजय विखे नेमकं काय म्हणाले होते?

सुजय विखे म्हणाले की, माझा राग शिवसेनेवर नाही. कारण माझ्या विजयात 50 टक्के शिवसेनेचा विजय आहे. त्यामुळे माझ्या तीन वर्षाच्या कारकीर्दीत एकदाही शिवसेनेच्या विरोधात किंवा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविरोधात वक्तव्य केले नाही. तसेच आजही माझं म्हणणं हेच आहे की, राष्ट्रवादी शिवसेना संपवण्याचे काम करत आहे, असा आरोप सुजय विखे यांनी केला.

पुढे बोलताना सुजय विखे म्हणाले की, कालचा निकाल हा त्याचाच परिणाम आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे यांनी लवकर जागं व्हावं. कारण शरद पवार यांनी वक्तव्य केलं की, या निकालाने मला काहीच धक्का लागला नाही. याचा अर्थ असा होतो की, शरद पवार यांना निकाल आधीच माहित होता. मात्र त्यांनी तो लपवून ठेवला. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना महाराष्ट्रापुढं मान खाली घालावी लागली, असं मत सुजय विखे यांनी व्यक्त केले.

Updated : 13 Jun 2022 7:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top