Home > Politics > वानखेडे कुटुंबाविरुद्ध मलिकांचे ट्विट्स तूर्तास बंद, कोर्टात दिली हमी

वानखेडे कुटुंबाविरुद्ध मलिकांचे ट्विट्स तूर्तास बंद, कोर्टात दिली हमी

वानखेडे कुटुंबाविरुद्ध मलिकांचे ट्विट्स तूर्तास बंद, कोर्टात दिली हमी
X

NCBचे विभागीय संचालक समीर वानखेडे, त्यांचे कुटुंबीय आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते तसेच मंत्री नवाब मलिक यांच्यातील संघर्ष आता हायकोर्टात पोहोचला आहे. समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्या विरुद्ध हायकोर्टात धाव घेतली होती. नवाब मलिक यांनी आपली बदनामी केली असल्याचा आरोप करत वानखेडे यांनी अब्रु नुकसानीचा दावा केला आहे. यावरील सुनावणी दरम्यान न्या. माधव जामदार यांच्या एकल खंडपीठाने मलिक यांना सोशल मीडियावर वानखेडे यांच्याविरुद्ध काही वक्तव्य करण्यास बंदी घालण्यास नकार दिला होता. त्यानंतर ज्ञानदेव वानखेडे यांनी या निर्णयाला हायकोर्टात पुन्हा आव्हान दिले. त्या याचिकेवर न्या. एस.जे. काथावाला आणि माधव जामदार यांच्या खंडपीढापुढे सुनावणी झाली.

वानखेडे यांच्या या याचिकेवर झालेल्या सुनावणी दरम्यान हायकोर्टाने नवाब मलिक यांना फटकारले. मलिक यांनी ९ डिसेंबर २०२१ पर्यंत ज्ञानदेव वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध कोणतेही वक्तव्य करु नये अशी हमी द्यावी किंवा कोर्टाला तसे आदेश द्यावे लागतील, असे कोर्टाने सुनावले. यानंतर मलिक यांनी असे कोणतेही वक्तव्य करणार नाही, अशी हमी वकिलांच्या माध्यमातून कोर्टाला दिली आहे.

" नवाब मलिक हे आधी आरोप करतात मग पुढे त्याचे पुरावे देत आहेत, मंत्री महोदय असे का वागत आहेत?" असा सवाल कोर्टाने विचारला. "जातपडताळणीसाठी यंत्रणा आहे, तिथे कुणीही जाऊ शकते, मग केवळ ट्विट करण्यात काय अर्थ आहे, हे फक्त माध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळवण्यासाठी सुरू आहे आणि तेही तुमच्या जावयाच्या अटकेनंतर हे होते आहे" या शब्दात कोर्टाने मलिक यांना फटकारले. यानंतर कोर्टाच्या सूचनेनुसार वकिलांनी नवाब मलिक यांच्याशी चर्चा करुन ९ डिसेंबरपर्यंत कोणतेही वक्तव्य करणार नसल्याची हमी दिली आहे.

Updated : 25 Nov 2021 8:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top