Home > Politics > Aryan Khan Drugs Case: क्रुझ पार्टीतून भाजप नेत्याच्या मेहुण्याला का सोडलं? नवाब मलिकांचा NCB ला सवाल

Aryan Khan Drugs Case: क्रुझ पार्टीतून भाजप नेत्याच्या मेहुण्याला का सोडलं? नवाब मलिकांचा NCB ला सवाल

Aryan Khan Drugs Case: क्रुझ पार्टीतून भाजप नेत्याच्या मेहुण्याला का सोडलं? नवाब मलिकांचा NCB ला सवाल
X

क्रूझ ड्रग्स प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाणा साधला. यावेळी मलिक यांनी माध्यमांशी बातचीत केली. क्रुझवरील ड्रग्ज पार्टीत १३०० लोकांमधून ११ लोकांना NCB ने ताब्यात घेतले होते. मात्र, त्यातील तीन जणांना NCB ने का सोडले? असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे.

या तीन लोकांमधील रिषभ सचदेवा हा भाजपचे नेते मोहित कंभोज यांचा मेहुणा असल्याने सोडण्यात आल्याचा खळबळजनक आरोप नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत करुन पुन्हा एकदा भाजप आणि NCB कनेक्शन असल्याचा आरोप केला.

६ ऑक्टोबर ला नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन NCB चे भाजप कनेक्शन असल्याचा आरोप केला होता. आणि आज नवाब मलिक यांनी भाजप युवा मोर्चाचे मोहित कंभोज यांच्या मेहुण्याला ताब्यात घेऊनही सोडल्याचा व्हिडीओ माध्यमांसमोर मांडून NCB कनेक्शन मांडून भाजपवर निशाणा साधला.

रिषभ सचदेवा, प्रतिक गाभा, अमीर फर्निचरवाला या तिघांना ताब्यात घेताना आणि त्यांच्या नातेवाईकांसोबत NCB च्या कार्यालयातून बाहेर पडतानाचा व्हिडीओही नवाब मलिक यांनी माध्यमांसमोर आणला.

क्रुझवर १३०० लोकांवर धाड टाकण्यात आली. ही धाड १२ तास सुरू होती. त्यातील ११ लोकांना ताब्यात घेतले. त्यानंतर अकरा जणांना NCB च्या कार्यालयात आणले होते. परंतु त्यापैकी तीन लोकांना सोडण्याचा आदेश दिल्लीवरून नेत्यांनी केल्याचा खळबळजनक आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

क्रुझवरील ही धाड ठरवून केलेला फर्जीवाडा होता. सेलिब्रिटींना बोलावून त्यांना अडचणीत आणण्याचा हा प्रकार होता. त्यामुळे NCB चे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी 'त्या' तिघांना का सोडले आणि कुणाच्या सांगण्यावरून सोडले याचा खुलासा करावा अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

रिषभ सचदेवा याला बाहेर सोडताना त्यांचे वडील आणि काका सोबत होते. या तीन व्यक्तींचे नातेवाईक NCB च्या कार्यालयात आले कसे. त्यामुळे रिषभ सचदेवाचे वडील आणि काका व झोनल अधिकारी समीर वानखेडे यांचे मुंबई पोलिसांनी कॉल डिटेल्स चेक केले तर संपूर्ण सत्य बाहेर येईल असेही नवाब मलिक म्हणाले.

केंद्रातील भाजप नेत्यांच्या दबावाखाली तिघांना सोडण्यात आले आहे. NCB च्या कारवाईत सुरुवातीपासून भाजपचे कनेक्शन होते हे सिद्ध झाले आहे. हे सगळं न्यायालयात सिद्ध होईलच परंतु जनतेच्या न्यायालयातही आले पाहिजे म्हणून हे प्रकरण मांडल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

ज्या एजन्सीबद्दल सवाल उपस्थित करण्यात आले असताना त्याच एजन्सीला कशी माहिती देणार? असा सवाल विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना करतानाच याबाबत एखादे कमिशन नेमा अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली.

जावई निर्दोष सुटेल...

NCB ने पत्रकार परिषद घेऊन आम्ही केलेले आरोप फेटाळून लावले आणि माझ्या जावयाला अटक केल्यामुळे त्यांनी हे केल्याचा आरोप केला. मात्र मी सुरुवातीपासून न्यायालयावर विश्वास ठेवून आहे. न्यायालयात जावई आपले निर्दोषत्व सिध्द करेल. मी पहिल्या पत्रकार परिषदेत सवाल उपस्थित केला त्यावेळी न्यायालयात जाऊन दाद मागा असे सांगण्यात आले. आताही काही सवाल उपस्थित केले आहेत. जे लोकसेवक म्हणवून घेत आहेत त्यांनी या सवालांचे उत्तर दिले पाहिजे असेही नवाब मलिक म्हणाले.

दरम्यान हे प्रकरण गंभीर असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यामध्ये लक्ष द्यावे अशी मागणीही नवाब मलिक यांनी यावेळी केली.

Updated : 9 Oct 2021 8:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top