Home > Politics > जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणूकीत भाजपच्या 'या' महत्वाच्या उमेदवारांचे अर्ज बाद

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणूकीत भाजपच्या 'या' महत्वाच्या उमेदवारांचे अर्ज बाद

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणूकीत भाजपच्या या महत्वाच्या उमेदवारांचे अर्ज बाद
X

जळगाव : जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणूकीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे, अशातच भाजपा खासदार रक्षा खडसेंचा महिला राखीव तसेच ओबीसी प्रवर्गातून दाखल केलेला उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाला आहे. दोन्ही गटातील त्यांच्या अर्जावर सही नसल्याने हे अर्ज बाद झाल्याचे सांगण्यात आले आहे, भाजपला हा मोठा धक्का बसला आहे. आता हे चुकून झाले की, खडसेंची खेळी याबाबत चर्चेला उधाण आले आहे.

दुसरीकडे विधानपरिषदेच्या माजी आमदार स्मिता वाघ यांनी अमळनेर विकास सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता, हा अर्ज देखील बाद झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भाईदास पाटील हे बिनविरोध निवडून येणार आहेत.

मुक्ताईनगर विकास सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे बिनविरोध निवडून येणार हे निवडणुकीपूर्वीच एकनाथ खडसे यांनी मोठी बाजी मारली आहे. माजी मंत्री गिरीश महाजन यांना हा मोठा धक्का आहे.

मुक्ताईनगर विकास सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे व त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचेच अर्ज उरलेत आहेत, याठिकाणी रोहिणी खडसे अर्ज मागे घेतील आणि रोहिणी खडसे महिला राखीव मतदारसंघातून लढतील अशी शक्यता व्यक्त होत आहे.

तर तिकडे भुसावळ विकास सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संतोष चौधरी यांचाही अर्ज बाद झाला आहे, याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे रमण भोळेंना उमेदवारीची संधी मिळणार आहे. संतोष चौधरी यांना पक्षांतर्गत कुरघोडींचा फटका बसल्याचे बोलले जात आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे सध्या तरी जड दिसून येत आहे.धरणगाव विकास सोसायटी मतदारसंघानंतर अमळनेर विकास सोसायटी, बोदवड आणि मुक्ताईनगर विकास सोसायटी मतदारसंघात उमेदवार बिनविरोध निवडून येणार आहेत.

Updated : 21 Oct 2021 3:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top