Home > Politics > #MNS राज ठाकरेंचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सल्ला

#MNS राज ठाकरेंचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सल्ला

#MNS राज ठाकरेंचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सल्ला
X

अलिकडच्या काळात समाजमाध्यमांवर अॅक्टीव्ह झालेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना काल मोजक्या शब्दात शुभेच्छा दिल्यानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठीत सविस्तर पत्र लिहत मोलाचा सल्ला दिला आहे.


राज ठाकरेंचे फडणीसांसाठी लिहलेले पत्र जसेच्या तसे....

उप-मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

यांसी सस्नेह जय महाराष्ट्र!

प्रिय देवेंद्रजी,

सर्वप्रथम महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री म्हणून आपण जबाबदारी स्विकारल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन. वाटलं होतं की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनच पुन्हा परताल, परंतु ते व्हायचं नव्हतं. असो....

तुम्ही ह्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सलग पाच वर्ष काम केलेत. आत्ताचं सरकार आणण्यासाठीही अपार कष्ट तुम्ही उपसलेत आणि इतकं असूनही आपल्या मनातील हुंदका बाजूला सारून, पक्षादेश शिरसावंद्य मानून उप-मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हातात घेतलीत, पक्ष, पक्षाचा आदेश हा कुठल्याही व्यक्तीच्या आकांक्षेपेक्षा मोठा आहे हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिलं. पक्षाशी बांधीलकी म्हणजे काय असतं त्याचा हा वस्तुपाठच आहे. ही गोष्ट देशातल्या आणि राज्यातल्या सर्व राजकीय पक्षातील आणि संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कायमस्वरुपी लक्षात ठेवण्यासारखी आहे. खरोखरच अभिनंदन!


आता जरा आपल्यासाठी

ही बढ़ती आहे की अवनती ह्यात मी जात नाही आणि कुणी जाऊही नये. पण एक सांगतो की, धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा तर दोरी मागे ओढावी लागते. ह्या मागे ओढलेल्या दोरीला कुणी माघार म्हणत नाही! तुम्हाला ह्या पुढेही बराच राजकीय प्रवास करायचा आहे.

एक निश्चित की तुम्ही तुमचं कर्तृत्व महाराष्ट्रापुढे सिद्ध केलेलंच आहे त्यामुळे देशाच्या भल्यासाठीही तुम्हाला अधिक काम करण्याची संधी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना.

पुन्हा एकदा तुमचं मनःपूर्वक अभिनंदन!

आपला मित्र

राज ठाकरे

Updated : 1 July 2022 7:35 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top