Home > Politics > वीज बिलाची वसुली करून राज्य सरकार शेतकर्‍यांची दिवाळी अंधारात घालणार का?- राधाकृष्ण विखे

वीज बिलाची वसुली करून राज्य सरकार शेतकर्‍यांची दिवाळी अंधारात घालणार का?- राधाकृष्ण विखे

वीज बिलाची वसुली करून राज्य सरकार शेतकर्‍यांची दिवाळी अंधारात घालणार का?- राधाकृष्ण विखे
X

अहमदनगर : वाढीव वीज बिल देऊन राज्यातील शेतकर्‍यांना राज्य सरकारने अर्थिक संकटात टाकले आहे. कोरोना संकट आणि नंतर राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झाला असताना आता हे वाढीव वीज बिलाचे ओझे शेतकऱ्यांच्या खांद्यावर टाकण्यात आले आहे.

शेतकर्‍यांच्या उत्पादीत मालाला भाव मिळू शकला नाही. राज्य सरकारची कोणतीही मदत शेतकर्‍यांना मिळू शकलेली नाही अशा परिस्थितीत वीज बिलाची वसुली करून राज्य सरकार शेतकर्‍यांची दिवाळी अंधारात घालणार का? असा सवाल भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

संगमनेर येथे माध्यमांशी बोलतांना आमदार विखे यांनी म्हटले आहे की, मुळातच शेतकर्‍याचे संपूर्ण वीज बील माफ करायला हवे ही आमची मागणी आहे. मात्र, राज्य सरकारला शेतकर्‍याच्या प्रश्नांचे काहीही देणेघेणे नाही.

महाविकास आघाडी सरकार फक्त घोषणा करते , कोणतीही अंमलबजावणी करत नाही. शेतकर्‍यांकडील वीज देयके साखर कारखान्यांनी वसूल करण्यासंबंधीचे पत्रक काढण्याचा कोणताही अधिकार साखर आयुक्त कार्यालयाला नाही असं आमदार विखे यांनी म्हटले आहे.

शेतकर्‍यांची वीजबील वसुली करण्यासंबंधीचे परीपत्रक तातडीने मागे घ्यावे, अशी मागणी आमदार विखे यांनी केली. कोणत्याही कारखान्याने शेतकर्‍यांकडून वीज बिलाची वसुली करू नये अन्यथा शेतकरी आंदोलन करून सरकारला धारेवर धरू असा इशारा त्यांनी दिला. याबाबत लवकरच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हे पत्रक मागे घेण्याची आपण मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Updated : 2 Nov 2021 4:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top