Home > Politics > पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची भेट, राजकीय तर्कवितर्क सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची भेट, राजकीय तर्कवितर्क सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची भेट, राजकीय तर्कवितर्क सुरू
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट झाली आहे. जवळपास १ तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यामुळे राजकीय तर्कवितर्कांना सुरूवात झाली आहे. दोन दिवसांपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. चीनसंदर्भातल्या मुद्द्यांवर या भेटीत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर शनिवारी सकाळी शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची भेट झाली. ही भेट नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर झाली याबाबत कोणतीही माहिती सध्या तरी उपलब्ध झालेली नाही. पंतप्रधान कार्यालयाने मोदी आणि पवार यांच्या भेटीचा फोटो प्रसिद्ध केला आहे.

फडणवीस यांच्या भेटीनंतर मोदींची शरद पवारांशी चर्चा

राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवरही ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. राज्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेवर शरद पवार यांनी काँग्रेसकडे नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारमध्ये मतभेद असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यामुळे फडणवीस यांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मोदी आणि शरद पवार यांची भेट झाल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

एकीकडे ही राजकीय चर्चा असली तरी येत्या १९ तारखेपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली आहे. त्यामुळे अधिवेशना संदर्भात या भेटीत चर्चा झाल्याचीही शक्यता आहे. कोरोना संकटाची हाताळणी, शेतकरी आंदोलन, अर्थव्यवस्था, भारत-चीन सीमावाद या मुद्द्यांवरुन विरोधक आक्रमक राहण्याची शक्यता आहे. तसेच काही महत्त्वाची विधेयकं देखील सरकारतर्फे मांडली जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर या भेटीत पंतप्रधान मोदींनी शरद पवार यांच्याशी चर्चा केली असण्याची शक्यताही व्यक्त होते आहे.

Updated : 2021-07-17T13:36:42+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top