Home > Politics > ममतांचा दिल्लीचा तीन दिवसांचा दौरा, भाजपच्या बड्या नेत्याचा पक्षप्रवेश होणार?

ममतांचा दिल्लीचा तीन दिवसांचा दौरा, भाजपच्या बड्या नेत्याचा पक्षप्रवेश होणार?

ममतांचा दिल्लीचा तीन दिवसांचा दौरा, भाजपच्या बड्या नेत्याचा पक्षप्रवेश होणार?
X

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दिल्लीत पोहोचल्या आहेत. दरम्यान, दिल्लीमध्ये त्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. एवढंच नव्हे तर, ममता बॅनर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत. त्या पुढील तीन दिवस राजधानी दिल्लीतच असणार आहे. गुरुवारी त्या कोलकात्यात परततील. या दौऱ्या दरम्यान भाजपमध्ये नाराज असलेले खासदार वरुण गांधी तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

सोनिया गांधी यांची घेणार भेट पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस पक्ष जवळ जवळ संपुष्टात आणला आहे. मात्र, तरीही ममता बॅनर्जी आणि सोनिया गांधी यांचे वैयक्तीक संबंध कधीही बिघडले नाहीत.

बिगर भाजप युती

ममता बॅनर्जींच्या दौऱ्याचे मुख्य उद्दिष्ट २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बिगरभाजप युतीवर काम करणे हे असल्याचे निरीक्षकांचे म्हणणे आहे. तसेच, पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूल युतीच्या शक्यतांबद्दल सुद्धा त्या आज बोलण्याची शक्यता आहे. याशिवाय नरेंद्र मोदींना आव्हान देण्यासाठी नेता म्हणून कोणाला सादर करायचे, यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. यावेळच्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी ज्या प्रकारे भाजपच्या विरोधात आघाडी घेतली आणि पुन्हा एकदा विजय मिळवला, त्यामुळे त्यांच्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावणं स्वाभाविक आहे.

दरम्यान, तृणमूल काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय स्तरावर विस्तार करण्याच्या स्वत:ला भावी पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून सादर करण्याच्या तयारीत असलेल्या ममता बॅनर्जी यांनी आसाम, त्रिपुरा, गोवा या राज्यासह उत्तर प्रदेश निवडणूकीतही पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उत्तर प्रदेशमधून ममता बॅनर्जी वरुण गांधी यांचा तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. ममता बॅनर्जी उत्तर प्रदेशची कमान वरुण गांधी यांच्या हाती देण्याची शक्यता आहे.

तृणमूलची अडचण...

तृणमूल काँग्रेससमोर एक मोठी अडचण आहे. राहुल गांधींना कसे रोखायचे? किंवा कॉंग्रेससमोर ममता बॅनर्जी याच विरोधी पक्षाच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवार असतील. असा प्रस्ताव कसा ठेवायचा? त्यामुळं ममता यांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

काँग्रेसची अडचण...

या सगळ्या पार्श्वभूमीवर, काँग्रेस नाराज होऊन ममता बॅनर्जींसोबत युती टाळण्याची शक्यता आहे. मात्र, काँग्रेसला फक्त ममता बॅनर्जीच नाही तर शरद पवार, मायावती आणि अखिलेश यादव यांच्यासारख्या नेत्यांचे आव्हानही असणार आहे.

मायावतींचा बहुजन समाज पक्ष कमकुवत झाला असला, तरी दलित नेता म्हणून त्यांची ओळख कायम आहे. त्याचप्रमाणे, अखिलेश यादव यांना ओबीसींचा आधार आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि बसपाने चांगली कामगिरी केल्यास त्यांची दावेदारी सुद्धा वाढू शकते. तर, शरद पवार यांना शेतकऱ्यांमध्ये मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळं कॉंग्रेसला या नेत्यांना देखील दुखावून चालणार नाही.

दरम्यान, मायावती, अखिलेश यादव आणि शरद पवार यासारख्या दिग्गजांना रोखण्यासाठी ममता बॅनर्जींचा वापर करावा, असं काँग्रेसला वाटू शकतं.

सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांच्या भेटीचे विशेष महत्त्व...

या आधीही ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत येऊन सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासोबतच, लालूप्रसाद यादव, अखिलेश यादव, शरद पवार यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना 2024 ला पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असेल हे जनता ठरवेल, पण भाजपला रोखणे गरजेचे आहे आणि त्यावर त्यांचा भर आहे. असं म्हणत त्यांनी आपले पत्ते उघड करण्यास नकार दिला होता.

Updated : 23 Nov 2021 6:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top