Home > Politics > Vedanta Foxconn : राज्याच्या राजकारणात दिवसभरात काय घडले?

Vedanta Foxconn : राज्याच्या राजकारणात दिवसभरात काय घडले?

Vedanta Foxconn : राज्याच्या राजकारणात दिवसभरात काय घडले?
X

Vedanta Foxconn प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्ये गेल्यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय गदारोळ निर्माण झाला आहे. शिंदे – फडणवीस सरकारने केंद्र सरकारच्या दबावामुळे हा प्रकल्प गुजरातमध्ये जाऊ दिला, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारच्या काळात कंपनीला योग्य तो प्रतिसाद न मिळाल्याने कंपनीने गुजरातची निवड केली असे उत्तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. यासर्व गदारोळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. दरम्यान या आरोप प्रत्यारोपाच्या गदारोळात गुरूवारी बऱ्याच घडामोडी घडल्या.

वेदांताचे अनिल अग्रवाल यांचे स्पष्टीकरण

केंद्र सरकारच्या दबावामुळे कंपनीला गुजरातमध्ये प्रकल्प न्यावा लागला, असा आरोप होत असताना वेदांता रिसोर्स लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी ट्विट करुन कंपनीने अभ्यास करुन व्यावसायिक निर्णय घेतल्याचे सांगितले. "ही अनेक वर्ष चालणारी एक शास्त्रीय आणि आर्थिक प्रक्रिया असते. आम्ही २ वर्षांपूर्वी सुरूवात केली होती. आमच्या अंतर्गत टीमने आणि व्यावसायिक संस्थांच्या मदतीने आम्ही गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू या राज्यांची नावं शार्टलिस्ट केली होती. गेल्या दोन वर्षात आम्ही सर्व राज्य सरकारांशी आणि केंद्र सरकारशी चर्चा केली आणि आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला.

पण आम्ही काही महिन्यांपूर्वीच आम्ही निकष पूर्ण करणाऱ्या गुजरातची निवड केली. पण जुलैमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, त्यांनी इतर राज्यांना मागे सारण्यासाठी मोठी ऑफर देखील दिली होती. पण आम्हाला सुरूवात करायची असल्याने आम्ही आमच्या व्यावसायिक आणि स्वतंत्र सल्लागारांच्या सल्ल्यानुसार गुजरातची निवड केली. अब्जावधी रुपयांच्या या प्रकल्पाततून भारताच्या इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये मोठे परिवर्तन घडणार आहे. आम्ही देशभरात याची एक इकोसिस्टीम तयार करणार आहोत आणि महाराष्ट्रातही गुतंवणूक करण्यास आम्ही वचनबद्ध आहेत. गुजरातमधील आमच्या संयुक्त प्रकल्पात महाराष्ट्राची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे."

देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर

अनिल अग्रवाल यांच्या या स्पष्टीकरणानंतर परदेश दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत अग्रवाल यांचे आभार मानले आणि विरोधकांना टोला लगावला. वेदांता-फॉक्सकॉनच्या संलग्न प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड केल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार! महाराष्ट्रात गुंतवणूक यावी यासाठी आम्ही कायमच स्पर्धात्मक आणि व्यवसायपूरक राहू, असे त्यांनी म्हटले आहे. पण त्यातबरोबर राजकीय स्वार्थासाठी अतिशय चुकीचे, नकारात्मक आणि निराधार करत विरोधकांनी त्यांच्या अकार्यक्षमतेचेच प्रदर्शन केले असा टोला त्यांनी लगावला. "महाराष्ट्रात 3.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक रिफायनरीच्या माध्यमातून येत असताना त्याला विरोध कुणी केला, हा प्रकल्प कुणी लांबविला? स्वतः कार्यक्षम होण्यावर आधी लक्ष केंद्रीत करा, ना की अस्वस्थता आणि नकारात्मकतेवर" य़ा शब्दात त्यांनी टीका केली.

शरद पवार यांची टीका

दरम्यान या वादावर मौन बाळगलेल्या शरद पवार यांनी गुरूवारी मौन सोडले आणि सत्ताधारी तसेच विरोधक यांना सल्ला दिला. हा प्रकल्प महाराष्ट्रात होणार होता, पण तो गुजरातला गेला, आता त्यावर वाद करण्यापेक्षा महाराष्ट्रात काय करता येईल यावर चर्चा करावी, आरोप प्रत्यारोप बंद करावे असे आवाहन शरद पवार यांनी केले. पण त्यांनी यावेळी मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्र्यांवर टीका देखील केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे निदर्शने

दरम्यान राज्य सरकारविरोधात राष्ट्रवादीने रस्त्यावर उतरुन निषेध केला. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यामुळे मराठी तरुणांचा हक्काचा रोजगार गेला, असा आरोप करत पुण्यात सुप्रिया सुळेही आंदोलनात सहभागी झाल्या.

Updated : 15 Sep 2022 1:01 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top