Home > Politics > भाजपचे मिशन 150, अमित शाहांच्या दौऱ्यानंतर घडामोडींना वेग

भाजपचे मिशन 150, अमित शाहांच्या दौऱ्यानंतर घडामोडींना वेग

भाजपचे मिशन 150, अमित शाहांच्या दौऱ्यानंतर घडामोडींना वेग
X

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यानंतर आता भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. अमित शाह यांनी पक्षाच्या बैठकीत मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासह उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आदेश कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर "आम्ही 150 पेक्षा अधिक जागा जिंकण्यासाठी लढत आहोत" अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

मुंबई दौऱ्या दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संघटनात्मक बैठका घेतल्या. तसे भाजप मजबूत करण्यासाठी सूचना दिल्या आहेत, अशी माहिती वाबनकुळे यांनी दिली आहे. 2024 मधील लोकसभा, विधानसभा तसेच महापालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीची सत्ता बहुमताने आणण्यासाठी शाह यांनी सूचना केल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. आम्ही 150 पेक्षा अधिक जागा जिंकण्यासाठी लढत आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली योजना आखणार असून मुंबईची जनता यावेळी आम्हाला बहुमत देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

मुंबईत ज्यांची 35वर्ष सत्ता असूनही मुंबईचा विकास झाला नाही, तसेच भ्रष्टाचारमुक्त मुंबई झाली पाहिजे हे स्वप्न आम्ही पूर्ण करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर शिवसेनेच्या धोकेबाज या टीकेला उत्तर देताना महाराष्ट्राला माहित आहे धोकेबाज कोण आहे, 2014 आणि 2019 ला कोणी धोका केला हे जनतेला माहिती आहे, धोकेबाजांना पळवायचे आहे, असे सांगत जनताच खऱ्या धोकेबाजांना धडा शिकवेल असा दावाही त्यांनी केला.

Updated : 6 Sept 2022 11:17 AM IST
Next Story
Share it
Top