Home > Politics > Special Report : एकनाथ शिंदेंचा शिवसेनेवर ताबा? उद्धव ठाकरे ना काढणार शिवसेनेबाहेर?

Special Report : एकनाथ शिंदेंचा शिवसेनेवर ताबा? उद्धव ठाकरे ना काढणार शिवसेनेबाहेर?

शिवसेनेत निर्माण झालेल्या वाद हा उद्धव ठाकरे यांनाच पक्षाबाहेर काढण्याची तयारी सुरू आहे का? एकनाथ शिंदे गटाचे वर्चस्व निर्माण झाले आहे का? शिवसेनेत वरपासून तळागाळापर्यंत सुरू असलेली खदखद कशी कारणीभूत आहे? याची कारणं मांडणारा Exclusive रिपोर्ट..

Special Report : एकनाथ शिंदेंचा शिवसेनेवर ताबा? उद्धव ठाकरे ना काढणार शिवसेनेबाहेर?
X

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला लागलेली आमदारांची गळती अजूनही सुरूच आहे. शिवसेनेमध्ये आमदारांनी ज्या पद्धतीने शिंदे गटात जाण्याचा सपाटा लावला आहे ते पाहता ही संख्या वाढणार आहे. मंत्री उदय सामंत हे नुकतेच शिंदे गटात सामील झाले आहेत. याच पाठोपाठ काही आमदार आणि खासदार लवकरच शिंदे गटात सामील होतील आणि त्या पाठोपाठ शिवसेनेत उभी फूट पडणार आहे, अशी माहिती शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने दिली आहे. शिवसेनेचे अनेक जिल्हाध्यक्ष, त्याचबरोबरीने शिवसेनेचे काही खासदार, शिवसेनेचे काही पराभूत उमेदवार हे एकनाथ शिंदे गटात जाणार आहेत, अशीही माहिती मिळते आहे.

निवडणुकंमध्ये शिवसेनेची मुख्य लढाई ही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असते. त्यामुळे शिवसेनेतील पराभूत उमेदवार ही आता शिंदे गटात सामील होण्यासाठी तयार आहेत. याबाबत बोलताना

बंडखोर आमदार भरत गोगावले यांनी पराभूत उमेदवारांची व्यथा मांडली आहे, "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जर आमच्याशी चर्चा केली असती, पराभूत झालेल्या उमेदवारांना बोलावले असते तर त्यांना कळले असते. उद्या आघाडी राहिली नाही तर त्या मतदारसंघात आपल्याला उमेदवार द्यावा लागेल. त्याला निवडून यायचे असेल तर त्याला तिथे कामं करावी लागतील. अजित पवार त्यांच्या माणसाला १० कोटी देत होते, पण पण आपला मुख्यमंत्री असूनही आम्हाला निधी मिळत नव्हता. मग तो उमेदवार निवडून कसा येणार, असा सवाल भरत गोगावले यांनी विचारला आहे."

या पार्श्वभूमीवर मुख्य शिवसेना हीच आता एकनाथ शिंदे यांच्या बाजूने होईल, असे दिसते आहे, अशी उभी फूट पडली तर उद्धव ठाकरे यांना शिवसेना नाव आणि पक्षाची निशाणी गमवावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शिवसेनेच्या घटनेप्रमाणे जरी उद्धव ठाकरे यांना सर्वाधिकार देण्यात आले असले तरीसुद्धा शिवसेनेमध्ये संघटनात्मक पेच निर्माण करुन हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे आणि शेवटी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकवायचे आणि उद्धव ठाकरे यांना मात द्यायची असा घाट एकनाथ शिंदे गटाने घातलेला असल्याची माहिती मिळते आहे.

यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे वकील दिलीप तौर यांनी सांगितले की, "पक्षाच्या चिन्हाचा वाद निवडणूक आयोगाकडे गेल्यानंतर त्याचा निर्णय होईपर्यंत ते चिन्ह गोठवले जाते, कारण पक्षाच्या चिन्हाचा वाद हा दोन दिवसात सुटणारा नाही, त्याला वेळ लागत असतो. त्यामुळे निवडणूक आयोगातर्फे दोन्ही बाजूंना वेगळ्या चिन्हावर लढण्याची सूचना केली जाते."

एकनाथ शिंदे यांच्या फुटीर गटाला कुठल्या तरी पक्षात विलीन होण्याचा एकमेव पर्याय आहे, तरच त्यांची आमदारकी टिकेल, असा युक्तीवाद शिवसेना आणि त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. पण ही परिस्थिती निर्माणच होऊ द्यायची नाही, अशा पद्धतीने आपले डाव टाकायचे आणि थेट उद्धव ठाकरे यांनाच शह द्यायचा अशी व्यूहरचना शिंदे गटाने आखल्याची माहितीही सुत्रांनी दिली आहे.

एकनाथ शिंदे यांना शिवसैनिकांनी पाठिंबा देण्याचे आवाहन करताना भरत गोगावले यांनी सांगितले आहे की, "पडत्या काळात जो माणसाच्या मदतीला येतो तो आपला. शिंदेसाहेब तसे मदतीला आले. त्यामुळे शिवसैनिकांना, मतदारांना, सर्व पदाधिकाऱ्यांना आवाहन आहे की आम्ही शिवसेना सोडलेली नाही, आम्ही शिवसेनेत आहोत. बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे हे आमचे नेते आहेत. आता त्यात एकनाथ शिंदे यांची भर पडली आहे. त्यामुळे सगळ्यांनी शिंदे साहेबांना साथ द्यायची आहे" असे आवाहन त्यांनी केले आहे.

ही व्यूहरचना यशस्वी झाली तर मूळ शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट निर्माण करुन उद्धव ठाकरे यांना संघर्ष करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शिवसेनेमध्ये जो अभूतपूर्व संघटनात्मक पेच निर्माण झाला आहे त्यात उद्धव ठाकरे हेच शिवसेनेतून बाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात निर्माण झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील बंडाने हा संघर्ष आता सर्वोच्च पातळीवर गेला आहे. एवढेच नाही तर उद्धव ठाकरे यांनाच शिवसेनेतून बाहेर जाण्याची वेळ निर्माण होणं यामुळे या संघर्षात उद्धव ठाकरे हे प्रचंड बॅकफूटवर गेल्याचे दिसते आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेत उभी फूट पडण्याची शक्यता नाही, असे मत व्यक्त केले आहे." शिवसेनेची गाव, जिल्हा ब्लॅाक स्तरावरची बैठक झाली. त्यांनी एकत्रितपणे निर्णय घेतला आणि उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ते उभे राहिले आहेत. त्यामुळे शिवसेना ताब्यात घ्यायचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत" असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

यासर्व प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसकडून उद्धव ठाकरे यांना अद्याप हवी तशी मदत झालेली नाही. शिवसेनेला ही लढाई आता रस्त्यावर उतरुन लढावी लागेल. शिवसेनेच्या सर्व स्तरावरील नेतृत्वामध्ये हे संकट कसे हाताळायचे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या संकटाशी सामना कसा करायचा याबाबत रणनीती कशी असावी याबद्दल उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी तयारी करत आहेत. पण सध्या तरी एकूण परिस्थिती पाहता या स्थितीला देवेंद्र फडणवीस यांच्या साथीने एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व असल्याचे दिसते आहे.

Updated : 26 Jun 2022 2:50 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top