Home > Politics > संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीस यांना सल्ला

संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीस यांना सल्ला

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यात सत्तासमीकरणाला रंगत आली आहे. तर भाजपच्या बैठकांचा जोर वाढला आहे. त्यावर संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना सल्ला दिला आहे.

संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीस यांना सल्ला
X

एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधातच बंड केले आहे. त्यामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर 12 जुलैपर्यंत विधानसभा उपाध्यक्षांनी बंडखोर आमदारांना बजावलेल्या अपात्रतेच्या नोटीसीला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात सत्तासमीकरणं जुळवण्यासाठी भाजपकडून बैठकांचा जोर वाढला आहे. त्यापार्श्वभुमीवर संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना सल्ला दिला आहे.

संजय राऊत हे माध्यमांशी बोलत असताना म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विरोधी पक्षातील सर्वात मोठं संख्याबळ आहे. त्यामुळे भाजप सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे. एवढं संख्याबळ विरोधी पक्षाला मिळत नव्हते. मात्र सध्याच्या विरोधी पक्षाकडे ते आहे. त्यामुळे त्यांनी संख्याबळाचा योग्य वापर करून विरोधी पक्ष म्हणून चांगलं काम करावं. डबक्यात उतरू नये, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे.

बंडखोरांचा डबकं म्हणून उल्लेख

शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी भाजप आणि शिवसेनेची सत्ता स्थापन होण्याची मागणी केली आहे. त्यापार्श्वभुमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर बैठकांचा जोर वाढला आहे. मात्र भाजप वेट अँड वॉचच्या भुमिकेत आहे. त्यावर प्रतिक्रीया देतांना संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांनी डबक्यात उतरू नये असा सल्ला दिला आहे. तर बंडखोर आमदारांचा उल्लेख डबकं असा केला आहे.

दीपक केसरकर यांना टोला

दीपक केसरकर यांनी उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याची विनंती केली आहे. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, उध्दव ठाकरे यांनी काय करावं? याचा निर्णय उध्दव ठाकरे घेतील. गुवाहाटीत बसून सल्ले देऊ नका. इथं या आणि समोर येऊन सांगा, असंही संजय राऊत म्हणाले.

एकनाथ शिंदेंविषयी मनात कटूता नाही

संजय राऊत यांना एकनाथ शिंदे यांच्याविषयी विचारले असता ते आमच्या पक्षाचे नेते आहेत. तसंच ते आमचे सहकारी आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी माझ्या मनात कटूता नाही. त्यांनी महाराष्ट्रात यावं आणि उध्दव ठाकरे यांच्याशी बोलावं असंही संजय राऊत म्हणाले.

ED च्या चौकशीला हजर राहणार का?

संजय राऊत म्हणाले की, मी काही दिवस पक्षाच्या कामात असणार आहे. तसंच मला कायदे कळतात. कारण मी कायदे बनवणाऱ्या सभागृहाचा सदस्य आहे. त्यामुळे जर ईडीला वाटलं तर त्यांनी मला त्यांना हवं त्या ठिकाणाहून अटक करावी. कारण हा स्वातंत्र्याचा दुसरा लढा आहे.

दीपक केसरकर यांना आव्हान

दीपक केसरकर यांनी संजय राऊत यांनी कोणतीही निवडणूक लढवली नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा आणि जनतेतून निवडून यावं असं म्हटलं होतं. त्यावर संजय राऊत म्हणाले की, केसरकर यांनी आता सावंतवाडीतून निवडून येऊन दाखवावं.

Updated : 28 Jun 2022 5:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top