Home > Politics > #Assembly : भाजप-शिंदे गटाचा पहिला विजय, राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष

#Assembly : भाजप-शिंदे गटाचा पहिला विजय, राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष

#Assembly : भाजप-शिंदे गटाचा पहिला विजय, राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष
X

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर ठाकरे सरकार कोसळले आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि शिंदे गटाचे नवे सरकार स्थापन झाले. या सरकारने विधिमंडळात पहिला मोठा विजय मिळवला आहे. दोन दिवसांच्या विशेष अधिवेशनात पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजप शिंदे गटातर्फे असलेले उमेदवार राहुल नार्वेकर हे विजयी झाले आहेत. तर महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांचा पराभव झाला आहे.

राहुल नार्वेकर हे महाराष्ट्रासह देशाच्या इतिहासातील सगळ्यात तरुण विधानसभा अध्यक्ष असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

भाजप आणि शिंदे गटाचे राहुल नार्वेकर यांना १६४ मतं मिळाली. तर महाविकास आघाडीचे राजन साळवी यांना १०७ मतं मिळाली. पण या निवडणुकीत समाजवादी पार्टीचे २ आमदार आणि MIM च्या एका आमदाराने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. तसेच मनसेचे आमदार राजू पाटील भाजप-शिंदे गटाला पाठिंबा दिला. तर हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या ३ आमदारांनी भाजप-शिंदे गटाला पाठिंबा दिला.

भाजपचे १०६ आमदार असले तरी आजारी असलेले आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यावेळी गैरहजर होते. या दोघांनी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणूकीत अँम्ब्युलन्समधून येऊन मतदान केले होते.

दरम्यान शिवसेनेने व्हीप बजावलेला असताना त्यांच्या आमदारांना पक्षादेशाविरोधात मतदान केल्याचा मुद्दा काँग्रेसने उपस्थित केला. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी यासंदर्भातले पत्र वाचून दाखवले आणि हा मुद्दा रेकॉर्डवर घेतल्याचे सांगण्यात आले.

Updated : 3 July 2022 6:50 AM GMT
Next Story
Share it
Top