Home > Politics > जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, आझाद गटाच्या 20 नेत्यांनी सोडला पक्ष...

जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, आझाद गटाच्या 20 नेत्यांनी सोडला पक्ष...

जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, आझाद गटाच्या 20 नेत्यांनी सोडला पक्ष...
X

काँग्रेससाठी आणखी एका राज्यातून अस्वस्थ करणारी बातमी समोर आली आहे. जम्मू-काश्मीर काँग्रेसच्या 20 वरिष्ठ नेत्यांनी बुधवारी पक्षाचा राम राम ठोकला आहे. यामध्ये चार माजी मंत्री आणि तीन माजी आमदारांचा समावेश आहे. त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले नाही, असे या नेत्यांचे म्हणणं आहे. मात्र, त्यांचा खरा विरोध जम्मू-काश्मीर काँग्रेसचे अध्यक्ष गुलाम अहमद मीर यांना असल्याचं समजतंय.

दरम्यान, पक्ष सोडलेल्या माजी मंत्र्यांमध्ये जीएम सरूरी, जुगल किशोर, विकार रसूल आणि डॉ. मनोहर लाल यांचा समावेश आहे. तसेच, सर्व नेत्यांनी आपले राजीनामे पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पाठवले आहेत.

'वेळ दिला गेला नाही' या नेत्यांच म्हणणं आहे की, त्यांच्या समस्यांकडे पक्षनेतृत्वाने लक्ष वेधण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि गेल्या एक वर्षापासून ते पक्ष नेतृत्वाकडे भेटीची वेळ मागत होते. मात्र. त्यांना वेळ देण्यात आला नाही. यासोबतच, प्रदेशाध्यक्ष मीर यांच्यावर निशाणा साधत या नेत्यांनी सांगितले की, त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस डबघाईला आली असून अनेक बडे नेते पक्ष सोडून गेले आहेत.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभा ते डीडीसी, बीडीसी, पंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील काँग्रेसचा पराभव झाल्याचे पक्ष सोडलेल्या नेत्यांनी म्हटले आहे. एवढचं नव्हे तर, लोकसभा निवडणुकीत आणि डीडीसी निवडणुकीत सुद्धा त्यांच्या मुलाचा पराभव झाला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

धडाधड पक्ष सोडणारे नेते...

काँग्रेस सोडणाऱ्या नेत्यांची रांग खूपच मोठी आहे. 2014 मध्ये मोदी सरकार स्थापन झाल्यापासून अनेक राज्यांतील आमदार, विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री यांच्यासह अनेक नेत्यांनी काँग्रेस सोडली आहे. त्यामुळे अनेक राज्यांत पक्षाचे सरकारही गेले.

यापूर्वी, पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुझिन्हो फालेरो, महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा असलेल्या सुष्मिता देव आणि प्रियंका गांधी यांचे निकटवर्तीय ललितेश पति त्रिपाठी यांनी पक्षाला राम राम ठोकला आहे.

दबाव टाकण्याचा प्रयत्न?

गुलाम नबी आझाद हे काँग्रेसमधील बंडखोर G-23 गटातील नेते आहेत. त्यांच्या गटातील नेत्यांच्या एवढ्या मोठ्या संख्येने काँग्रेस सोडण्याचा अर्थ म्हणजे काँग्रेस हायकमांडवर दबाव आणणे. त्यामुळे प्रदेश काँग्रेसची कमान पुन्हा एकदा गुलाम नबी आझाद यांच्या हातात येऊ शकेल.

लवकरच निवडणुका होऊ शकतात.

जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात विधानसभा जागांच्या सीमांकनाची प्रक्रिया सुरू आहे. केंद्र सरकारने म्हटले आहे की, परिसीमनानंतर राज्यात निवडणुका होतील.

एकुणच, कलम 370 हटवल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे बदलले आहे. जम्मूमध्ये आपला पाया वाढवण्यासाठी भाजप वेगाने काम करत आहे. तर दुसरीकडे पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवर ठाम आहेत.

Updated : 17 Nov 2021 2:07 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top