Home > Max Political > 'मी चंद्रकांत पाटील यांना क्लिप पाठवली नाही' ; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुणे येथे वक्तव्य

'मी चंद्रकांत पाटील यांना क्लिप पाठवली नाही' ; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुणे येथे वक्तव्य

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भाषणाच्या क्लिप पाठवल्यामुळे मनसे-भाजप युती होणार असल्याची चर्चा सगळीकडे होत होती. मात्र, 'मी चंद्रकांत पाटील यांना क्लिप पाठवली नाही' असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते

मी चंद्रकांत पाटील यांना क्लिप पाठवली नाही ; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुणे येथे वक्तव्य
X

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भाषणाच्या क्लिप पाठवल्यामुळे मनसे-भाजप युती होणार असल्याची चर्चा सगळीकडे होत होती. मात्र, राज ठाकरे यांनी गुरूवारी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन चंद्रकांत पाटील यांना भाषणाच्या क्लिप्स पाठवल्याच नसल्याचा दावा केला आहे. तसंच "माझ्या स्पष्ट असतात. बैल मुततो तशा मी भूमिका बदलत नाही", असं राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

मी क्लिप्स पाठवल्याच नाहीत

राज ठाकरे बुधवारपासून पुन्हा एकदा ३ दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. ज्येष्ठ इतिहासकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी गुरूवारी १०० व्या वर्षात पदार्पण केलं. त्यांना शुभेच्छा दिल्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत ही भूमिका मांडली. यावेळी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर भाजपसोबत मनसे युती करणार का? असा सवाल त्यांना करण्यात आला. यावर उत्तर देताना "तुम्हीच प्रश्न निर्माण करता आणि आम्हाला उत्तर विचारता. मी चंद्रकांत पाटील यांना क्लिप पाठवली नाही. मी बोललो होतो क्लिप पाठवेन. परंतू त्यांना कोणी पाठवल्या माहीत नाही. त्यांना याबाबत मी विचारणार आहे. माझं भाषण हे हिंदीत होतं. ते हिंदी भाषिकांना आवडलं. तुम्हाला कळलं नसेल तर तुम्हाला पाठवतो. असं मी चंद्रकांत पाटील यांना म्हणालो होतो. त्यावर, मला पाठवा. मला ऐकायला आवडेल, असं ते म्हणाले होते. त्यानंतर मुंबईत आल्यावर मी एक दोघांशी याबाबत बोललो होतो. त्यापैकी एकाने पाठवली आहे की नाही ते विचारतो", अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली.

माझ्या भुमिका स्पष्ट

"राज ठाकरे यांनी परप्रांतियांबाबतची भूमिका स्पष्ट केली तर आम्ही युतीबाबत विचार करू", असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काही दिवसांपुर्वी म्हणाले होते. त्याबाबत राज यांना विचारण्यात आल्यावर, "भूमिका काय क्लिअर करायच्या. माझ्या भूमिका स्पष्ट आहेत. माझ्या भाषणात बैल मुतल्यासारखा मी विचार नाही करत. बैल उभ्या उभ्या चालता चालता मुततो. तसा विचार मी नाही करत. मी माझ्या भूमिका आजपर्यंत मांडल्या त्या अत्यंत स्पष्ट आहेत. त्या देश हिताच्या आहेत आणि महाराष्ट्र हिताच्या आहेत. त्यात प्रत्येक राज्यांनी आपली भूमिका कशी निभावली पाहिजे. काय काय गोष्टी केल्या पाहिजेत. तुम्ही आमच्यावर आक्रमण करू नका. आम्ही तुमच्यावर आक्रमण करणार नाही. आसाम आणि मिझोराममध्ये सध्या तेच होत आहे", असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

माझा विरोध भूमिकांना, व्यक्तिला नाही

भुमिकांबद्दल बोलताना, "माझा भूमिकांना विरोध असतो. व्यक्तीला नाही. हे मी अनेकदा स्पष्ट केलं आहे. मोदी असतील किंवा अमित शहा असेल यांच्याशी माझं वैयक्तिक देण घेणं नाही. ज्या भूमिका पटल्या नाहीत त्याला मी कायम विरोध केला आणि ज्या पटल्या त्याचं जाहीर अभिनंदनही केलं आहे. त्यांचं समर्थनही केलं. त्या समर्थनासाठी मोर्चाही काढला आहे. जे पटत नाही ते पटत नाही हे सांगणं महत्त्वाचं आहे. या सर्व गोष्टींसाठी छक्केपंजे करू का?", असंही ते म्हणाले.

Updated : 2021-07-29T16:08:21+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top