Home > Politics > मोदी नावाचं राजकीय रसायन शरद पवारांना का उमगलं नाही?

मोदी नावाचं राजकीय रसायन शरद पवारांना का उमगलं नाही?

पवारांच्या घरात ईडी म्हणजेच भाजप घुसले असून हा पवारांना संपवण्याचा प्रयत्न आहे का? राजकीय प्रवासात शरद पवार वेगळचं रसायन असं जरी म्हटलं जात असेल तरी पवारांचा अनेकदा अंदाज चुकला आहे... पवारांचा शिष्य असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाबतीत पवारांचा अंदाज चुकला आहे का? वाचा राजकीय विश्लेषक हेमंत पाटील यांचं शरद पवारांच्या राजकीय हवामान खात्याचा अंदाजावर केलेलं विश्लेषण

मोदी नावाचं राजकीय रसायन शरद पवारांना का उमगलं नाही?
X

शरद पवारांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त दिल्लीत एक कार्यक्रम झाला होता. देशातील दिग्गज या कार्यक्रमाला आले होते. स्टेजवर सर्व पक्षीय नेते उपस्थित होते. त्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले " पवारांना शेती बद्दल खूप कळतं. त्याबद्दल त्यांना खूप माहिती आहे. त्यांना हवामान खात्याचा अंदाज लवकर कळतो." असे वक्तव्य करून पुढे ते म्हणाले की "खास करून राजकीय हवामान खात्याचा अंदाज पवारांना फार चांगला कळतो." पवार सुद्धा एका मुलाखतीत म्हणाले होते की "सहसा माझा अंदाज चुकत नाही"...! हे खरं आहे. पवार नावाचे रसायन वेगळच आहे.

1967 साली पहिल्यांदा ते विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर गेल्या 54 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी लोकसभा, राज्यसभा व विधानसभेच्या निवडणुकीत कायम विजय मिळवलेला आहे. क्रिकेट संघटना, कुस्ती संघटना, शैक्षणिक संस्था, निवडणूक कोणतीही असो पवारांनी सतत विजय मिळवला आहे. फक्त क्रिकेटच्या बीसीसीआयच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एका मताने त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

दुसरा पराभव सीताराम केसरींविरुद्ध काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत. हे दोन अपवाद सोडले तर पवारांनी पराभव कधीच बघितला नाही. युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्षपद मिळाल्यावर पवारांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. अनेक तालुकात आपले कट्टर सहकारी तयार केले. स्वबळावर सुरवात केलेल्या पवारांनी 1978 – 80, 1988 – 91,1993 – 1995 असे तीन वेळा मुख्यमंत्री पद भूषवलेले आहे. केंद्रात संरक्षण मंत्री व कृषि मंत्री म्हणून त्यांनी आपली छाप पाडली आहे.

पवारांची वैशिष्टे सांगायची झाली तर – प्रचंड इच्छा शक्ति – प्रचंड मेहनत करण्याची तयारी – धोरणी – मुत्सदी – धाडसी - तीव्र स्मरणशक्ती – बेरजेचे राजकारण करण्यात पटाईत – संघटन चातुर्य – अभ्यासू – लोकांना जोडण्याची ताकत – सुसंस्कृत राजकारण या सारख्या अनेक गुण वैशिष्ट्यांनी पवार नावाचे रसायन तयार झाले आहे.

अटलबिहारींचे सरकार एका मताने पडले. त्यावेळेस मायावतींच्याकडे दोन मते होती. संसदेत मतदानाच्या आदल्या दिवसांपर्यंत मायावती तटस्थ राहण्याची भूमिका सोडत नव्हत्या. सोनिया गांधींच्या फोन नंतरही त्या ऐकत नव्हत्या. शरद पवारांनी अशी काय जादू केली की दुसर्यां दिवशी मायावतींनी अटलबिहारींच्या विरुद्ध मतदान केलं. सरकार पडलं. सभागृहात मायावतींनी पवारांकडे बघून व्ही अशी बोटाने खूण केली.

पंजाबचा लोंगोवाल करार असो किंवा कर्नाटक देवेगोडांशी चर्चा करण्याचा प्रसंग असो. पवारांच्या मध्यस्थीने कायम यश मिळाले आहे. निवडणुकीच्या काळात दोन तास झोप घेणारे उदाहरण विरळ असेल. भाषणे, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन, विरोधकांना पटवणे या सर्व ताण तणाव निर्माण होणार्या् गोष्टी करून फक्त दोन तास झोप घेण्याचे कसब फक्त पवारांमध्ये असावे.

आपल्या प्रचंड इच्छा शक्तीच्या जोरावर कॅन्सरवर मात करून आज सक्रिय राजकारणात तितकेच सहभागी रहाणे काय सोपं नाही...! त्यांचे राजकारण सहकारी संस्था चालकांवर जास्त अवलंबून राहिलं असे वाटते. साखर कारखाने – सुतगिरणी – सहकारी बँका – बाजार समित्या यांच्या संचालकांना पवारांनी आपले साथीदार बनवले. त्या वेळेसची ती गरज सुद्धा होती म्हणा.

काही प्रमाणात राज्याच्या राजकारणात पकड मिळवल्यावर पवार देशाच्या राजकारणात गेले. तिथे त्यांना चांगले यश मिळाले. परंतु त्यांना देशाचे सर्वोच्च पंतप्रधान पद काही मिळाले नाही. आज पवारांचे वय 80 आहे, त्यांचे 5 लोकसभेचे व 4 राज्यसभेचे खासदार आहेत. या जोरावर आज तरी त्यांना पंतप्रधानपद मिळणे अशक्य आहे. पवारांच्या आजवरच्या राजकीय प्रवासाचा विचारकरता पवारांचे असे का झाले..? देशाच्या सर्वोच्च पदाने त्यांना हुलकावणी का दिली..? पुण्यात त्यांचे घनिष्ठ मित्र राहुल बजाज जाहीर कार्यक्रमात म्हणाले होते की, न झालेले आज वरचे सर्वात चांगले पंतप्रधान..!

याचा विचार करताना काही गोष्टी समोर येतात. त्यांच्या राजकीय हवामान खात्याचा अंदाज काही वेळा चुकला किंवा तसा त्यांना आलाच नाही.

1. सर्वात प्रथम 1978ला ते जेंव्हा मुख्यमंत्री झाले तेंव्हा त्यांना वाटलेच नसेल की इंदिरा गांधी परत देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होतील. आणीबाणी लागू केल्याने 1977 ला इंदिरा गांधींचा पराभव होऊन जनता दलाचे सरकार आले आणि ते अंतर्गत कलहाने 1980ला पडले. त्यांना किंवा जनतेला सुद्धा वाटले नाही की इंदिरा गांधी परत सत्तेत येतील. इंदिरा गांधींनी आल्या आल्या पवारांचे सरकार बरखास्त केले आणि निवडणुका घेतल्या. इथे पहिल्यांदा पवारांना हवामानाचा अंदाज आला नाही.

2. त्यानंतर 1986 साली पवारांनी आपला एस काँग्रेस नावाने काढलेला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. ते परत स्वगृही आले आणि मुख्यमंत्री झाले. 1991च्या लोकसभेच्या निवडणुकीत राजीव गांधींची हत्त्या झाली आणि पवार लोकसभेत देशाच्या राजकारणात गेले. त्यांना पंतप्रधान व्हायचे होते. राजीव गांधींच्या हत्येनंतर पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधान झाले. दिल्लीला गेलेल्या पवारांनी त्यांना शह द्यायचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी पवारांचे निकटवर्ती कलमाडींना रेल्वे मंत्री करून पवारांनाच शह दिला. पवारांना परत राज्यात मुख्यमंत्री पदावर कार्यरत राहण्याची पाठवले. नरसिंहराव व दिल्लीचा पवारांना अंदाज आला नाही.
3. 1996 नंतर पवार देशाच्या राजकारणात जास्त सक्रिय झाले. राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले होते. सीताराम केसरी काँग्रेसचे अध्यक्ष होते. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाची निवडणूक झाली. त्यात पवार व माधवराव शिंदेंनी केसरी विरुद्ध अर्ज भरले. निवडणुकीत या दोघांचा मोठा पराभव झाला. केसरी मोठ्या मतांनी विजयी झाले. पवारांसारखा स्वयंभू नेता आला तर आपले राजकीय अस्तित्व संपेल या विचारांनी दिल्ली भोवताली काँग्रेसच्या दुय्यम नेत्यांनी केसरींना पाठिंबा दिला. पवारांना ह्या गोष्टीचा अंदाज घेता आला नाही.

4. 1998 साली सोनिया गांधींनी राजकारणात प्रवेश केला आणि काँग्रेसचे अध्यक्षपद त्यांना मिळाले. अनुभवी पवारांपेक्षा राजकारणात नवख्या सोनिया परवडल्या असा विचार करून दिल्लीत सोनियांना काँग्रेसने बळ दिले. पवार 1998 ला लोकसभेत काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते. काही काँग्रेस नेत्यांनी पवारांना त्रास द्यायला सुरुवात केली. देशात भाजप आणि आरएसएसने सोनिया गांधींना विदेशी सून / विदेशी पंतप्रधान नको म्हणून टीका करायला सुरू केली. पवारांनी सुद्धा आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने ह्याच मुद्यावर पक्ष सोडला व राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. पवारांनी सोनिया गांधी व इतर नेत्यांशी जुळवून घेतले असते तर 2004 साली ते नक्कीच पंतप्रधान झाले असते. इथेही त्यांना हवामान खात्याने धोका दिला.

5. पवारांनी नंतर राज्यातले संपूर्ण लक्ष काढले व केंद्रात जास्त सक्रिय झाले. त्याचा परिणाम राज्यात एका मर्यादेपुढे पक्षाची वाढ होऊ शकली नाही. राज्यातील त्यांच्या नेत्यांना मर्यादा होत्या. पवारांनी आपला पक्ष वाढवण्यासाठी लोककल्याणकारी निर्णयापेक्षा राजकीय गणितं जुळवण्यावर भर दिला. इतर पक्षातील तयार नेतृत्व आपल्याकडे वळवण्यात आले. प्रामुख्याने सांगायचे झाले तर छगन भुजबळ, गणेश नाईक. ही दुसऱ्या पक्षातील नेते मंडळी सोडून गेली तर काय. आपल्या पक्षातील नेते मंडळी सुद्धा सोडून गेली तर काय..? 2014च्या पार्श्वभूमीवर विचार केल्यास याचा अंदाज आला नाही असेच म्हणावे लागेल..!

6. पवारांनी प्रसिद्धी माध्यमांची फारशी दखल घेतली नाही. शक्यतो विरोधकांच्या आरोपाला ते उत्तर देत नसत. आजच्या तारखेला विचार केल्यास प्रसिद्धी माध्यमांचे अवास्तव महत्त्व व सोशल मीडिया, हे लोकांचे जनमत तयार करण्यास फार मोठी भूमिका वठवतील याचा अंदाज त्यांना आला नाही. 2012 पासून भाजप मीडियाला हाताशी धरून विरोधकांना बदनाम करतायत. अनेक विषयात मीडिया ट्रायल करतायत. सोशल मीडियात तर काहीही खोटे आरोप केले जातात. पवारांना यावर मात काही देता येत नाही..!

7. स्वतःची जाहिरात करणे हे पवारांच्या स्वभावातच नाही. उलट भाजप – मोदी कोणत्याही गोष्टींची जाहिरात करतात. बऱ्याच वेळा खोट्या गोष्टींवर त्या आधारित असतात. जाहिरातीत सातत्य असल्याने नागरिकांना त्यांच्या जाहिराती खऱ्या वाटू लागतात. पवारांच्या हवामान खात्याने त्यांना इथेही दगाच दिला. खोट्या जाहिराती असल्या तरी लोकं त्याला इतकी भुलतील हे काही त्यांना कळले नाही.

8. पवारांच्या राजकारणाचे अजून एक वैशिष्ट्ये सांगता येईल. विरोधकांची कामे ते आधी करतात आणि त्यांचा विरोध मोडून काढतात. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना पवारांनी केंद्रात त्यांना अनेक वेळा मदत केली. काही वर्षांपूर्वी मोदी पुण्याच्या साखरसंकुलात कार्यक्रमाला आले होते. त्यांनी जाहीर सभेत पवार आपले गुरू आहेत. त्यांचे बोट धरून मी राजकारणात आलो असे विधान केले. त्यामुळे पवार आणि राष्ट्रवादी काही अंशी खुश झाले. परंतु त्याचा परिणाम असा झाला की, भाजपप्रति विरोध कमी झाला आणि भाजप पवारांच्या आमदारांना आपल्याकडे ओढत राहिले. अरुण जेटलींनी सुद्धा बारामतीत येऊन बारामती आणि पवारांचे तोंड भरून कौतुक केले. त्यावेळेस सुद्धा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची गोची झाली. या खेळीचा अंदाज पवारांना आला नाही.

9. 2014 साली विधानसभेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली. पवारांनी निकालाच्या दुसऱ्या दिवशी भाजपला न मागता पाठिंबा जाहीर केला. परिणामी सेना सहा महिने विरोधी बाकावर बसली. काही प्रमाणात सेना भाजपात वितुष्ट आले. परंतु नंतर ते एकत्र झाले. याचा परिणाम राष्ट्रवादीवर जास्त झाला. पवारांवर गद्दारीचा शिक्का आधीच होता. त्यात ह्या त्यांच्या खेळीने सेना व काँग्रेस त्यांच्यावर नाराज झाली. याचा अंदाज त्यांना घेता आला नाही.

10. मोदी - शहा आणि आरएसएस प्रशासनावर इतकी पकड मिळवतील आणि गैर मार्गाने विरोधकांना संपवतील अशी पुसटशी शंका सुद्धा 2014 साली त्यांना आली नाही. आज ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स या सारख्या संस्थांना हाताशी धरून जो काही प्रकार सेना राष्ट्रवादी बरोबर चाललाय याचा अंदाज पवारांना आला नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत विदर्भात बाळू धानोरकर काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवीत होते. ऐन प्रचाराच्या 13 दिवसांच्या काळात त्यांच्यावर आयकर विभागामार्फत रेड घातली. तेंव्हा तरी पवारांना मोदी शहांच्या क्रूरतेचा अंदाज यायला पाहिजे होता.

11. हमाम में सब नंगे । राजकारणात आमदार, खासदार, नगरसेवक होतो तोच मुळी खोटे प्रतिज्ञापत्र देऊन. सर्वजण पैसे खातात. तरी सुद्धा किरीट सोमय्या आरोप करतात आणि ईडी - आयकर विभाग रेड घालतात. ते ही फक्त विरोधकांवर.. भाजपमध्ये सर्व भ्रष्टाचार मुक्त आहेत का…? यावर नक्की काय करावे हेच मुळी पवारांना समजत नाही.

12. याचे मूळ सत्तेत आहे आणि ती निवडणूक आयोग व ईव्हीएमच्या मार्फत मिळवली जाते ह्यावर पवारांनी कधी विचारच केला नसेल. भाजपच्या बाजूने वक्तव्य करणे, भाजपला अनुकूल कृती करणे, भाजप नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या आधी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे अशी अनेक उदाहरणे देता येतील. ईव्हीम मधील दोषांबद्दल खूप घटना आहेत. परंतु पवारांना अजूनही ते काही पटत नाही, कळत नाही असे दिसते.

शेवटी न सापडणारा उपाय -

राज्यपालांची भाजपला अनुकूल भूमिका, इतिहास बदलणे, सोशल मीडियावर आपल्या विरोधी लोकांना देशद्रोही ठरवण्यासाठी भाजपाची समांतर फळी तयार करणे, फक्त मुलाखती मार्फत आपल्या लोकांची प्रशासनात नियुक्ती करणे, दंगली घडवणे, आंदोलनात आपली लोकं घुसवून दंगली माजवणे – आंदोलन मोडणे, कोर्टाच्या संदिध भूमिका अश्या कितीतरी गोष्टी आहेत त्यावर पवारांना उपाय सापडत नाही. त्या गोष्टीचा अंदाजच येत नाही.

पवारांचा एकूण राजकीय प्रवास पाहता ते घाबरण्यातले नाहीत..! संकटाला भिऊन पळणारे नाहीत, वश होणारे नाहीत..! परंतु आज पवारांच्या घरात आयकर विभाग म्हणजे एका अर्थी भाजप घुसलेत..! ते गोड बोलून लवकरात लवकर पवारांना संपवण्याचा प्रयत्न करणार हे निश्चित..! तरी सुद्धा पवारांना स्वतःला व राष्ट्रवादीला वाचवण्याचा उपाय सापडत नाही हे दुर्दैव…!

मोदींच्या अडवाणी आणि पवार या दोन गुरूंना मोदींचा अंदाजच घेता आला नाही आणि शिष्याला नमवता सुद्धा येत नाही. धरलं तर चावतयं अन् सोडलं तर पळतंय अशी अवस्था या दोघांची झालीय. सर्वात महत्वाचे म्हणजे गुजरात दंगलीतील मोदी-शहा किती क्रूर आहेत याचा अंदाज पवारांना आला नाही.

81व्या वयातील पवारांविषयी सलील कुलकर्णींच्या भाषेत

"दमलेल्या काकांची कहाणी….. ना ना ना ना……."

असे म्हणावे लागेल…!

धन्यवाद …!

हेमंत पाटील

निवडणूक सल्लागार

कृष्णा कन्सल्टन्सी, पुणे

मो. 8788114603

व्हाट्सएप 7774035759 / 8788114603

Updated : 2021-10-10T15:14:39+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top