Home > Politics > #EDईडी कुणाच्या इशाऱ्यावर नाचतेय?

#EDईडी कुणाच्या इशाऱ्यावर नाचतेय?

#EDईडी कुणाच्या इशाऱ्यावर नाचतेय?
X

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक विकासमंत्री नबाव मलिक (Nawab Malik) यांना सक्त वसुली संचालनालयाने (ED) अटक केली आहे. यावरून राजकारण तापले असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावरील तक्रार राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुढे आणली आहे. तीन वर्षांपासून तक्रार दाखल असूनही त्यांच्यावर ईडीने कोणतीही कारवाई केली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी फडणवीस यांच्या विरोधात ईडीकडे करण्यात आलेली तक्रारच ट्विट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, 4 सप्टेंबर 2019 म्हणजे 3 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना मोहनीश जबलपुरे यांनी ॲक्सिस बँक नुकसानीचा सप्रमाण लेखाजोखा ईडीकडे सादर केला, त्याचा हा पुरावा. या तीन वर्षात दोघांपैकी एकालाही ईडीने बोलावले नाही. ईडी कुणाच्या इशाऱ्यावर नाचतेय?

मलिक यांना कोठडी सुनावल्यानंतर भाजपने त्यांच्या राजीनाम्यांची मागणी केली आहे. तर महाविकास आघाडी सरकारने मलिक यांचा राजीनामा घेणार नसल्याची भूमिका घेतली आहे. मलिक यांच्या अटकेनंतर महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ही बैठक झाली. या बैठकीत मलिक यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आला. ईडी कार्यालयातून बाहेर आल्यानंतर मलिक यांनी `नही झुकेंगे और भी लढेंगे, सबको एक्सपोज कर देंगे` अशी प्रतिक्रिया दिली.

अटक झाल्यानंतर नबाव मलिक यांना वैद्यकीय तपासणीसाठी जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले. तिथून त्यांना ईडीच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. ईडीने त्यांच्या कोठडीची मागणी केली. खुद्द मलिक यांनी मला कोणतेही समन्स नव्हत, मला जबरदस्तीने येथे आणलयं, असा दावा न्यायालयात केला. मलिक यांनी गँगस्टर दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरला मालमत्तेसाठी पैसे दिले. पारकरने ते इब्राहिमला दिले, असा दावा करत हे 'टेरर फंडिंग` असल्याचा युक्तिवाद केला. अखेर न्यायालयाने त्यांची ईडीच्या कोठडीत रवानगी केली आहे.

Updated : 24 Feb 2022 1:17 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top